Dhule News : भूमाफियांच्या गैरउद्योगाला महासभेचा लगाम; उचित कार्यवाहीचा प्रशासनाला आदेश

esakal
esakalMayor Pratibha Chaudhary, Nagsen Borse, Devidas Tekale, Manoj Wagh.

धुळे : देवपूरमधील ४०६०.९ चौरसमीटर आरक्षित जागा हडप करण्याच्या भूमाफियांच्या गैरउद्योगाला महापालिकेच्या महासभेने बुधवारी (ता. २९) लगाम घातला.

निवडीनंतर पहिल्याच महासभेला सामोरे जाताना महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी देवपूरवासीयांच्या भल्यासाठी भूसंपादनाचा निवाडा महापालिकेच्या नावे होण्यासाठी उचित कार्यवाहीचा आदेश प्रशासनाला दिला. (Municipal Corporations General Assembly curbs land mafia business of grabbing 4060 9 square meters of reserved land in Deopur dhule news)

तसेच कणखर भूमिका घेत महापौरांनी आरक्षित जागेप्रकरणी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला दिले, अन्यथा अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशाराही महापौरांनी दिला.

महापालिकेची महासभा सकाळी अकराला झाली. महापौर चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. अजेंड्यावर विविध विषयांसह देवपूरमधील देवरे ॲक्सिडेंट हॉस्पिटलजवळील सर्व्हे क्रमांक ३५/१/ ब, विस्तारित सि.स. क्रमांक ८४९४ मधील ४०६०.९ चौरसमीटर जागेच्या भूसंपादनासंबंधी निवाडा रद्द करण्याविषयीचा मुद्दा होता.

या विषयावर सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी वादळी चर्चा घडवत महापालिकेसह जनहिताची बाजू मांडली. या प्रकरणी झालेल्या हेराफेरीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना जाब विचारला. यात महापौर चौधरी यांनी या जागेसंबंधी गैरघडामोडी उजेडात आणणाऱ्या आणि महापालिकेला सजग करणाऱ्या ‘सकाळ’सह संबंधित पत्रकारांचे विशेष आभार मानले. -

मनपाचे नाव गहाळ कसे?

नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले, की १९६५ मध्ये तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवकांनी भविष्याच्या दृष्टीने देवरे ॲक्सिडेंट हॉस्पिटलजवळील जागा मंडई, मार्केटसाठी आरक्षित केली. त्यामुळे आज या जागेचे मोल वाढले आहे; परंतु सिटी सर्व्हेकडून दिल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी कार्डवर या जागेविषयी आरक्षण, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या भूसंपादनाचा इतर हक्कात समावेश का दिसत नाही? मनपाचे नाव गहाळ कसे झाले? सध्या ३० ते ४० कोटींच्या किमतीची ही जागा हेडा नामक व्यक्तीने सुमारे साडेतीन कोटी रुपयांत परस्पर विकली. विशेष म्हणजे या जागेवरील अतिक्रमण मनपाने हटविले. वॉल कंपाउंड बांधायला दुसऱ्यालाच परवानगी दिली गेली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

esakal
Coding Program: कोडिंगमुळे विद्यार्थी होणार अधिक स्मार्ट! या शैक्षणिक वर्षांपासून होणार अभ्यासक्रमात समावेश

जागा ताब्यात घ्यावी

दरम्यान, झुलेलाल सोसायटीने या जागेवरील दावा-हक्क सोडलेला नाही. देव होस्टेलची जागा मिळत नाही तोपर्यंत हा दावा कायम राहील. मनपानेही दावा सोडलेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता सरासरी अडीच कोटी रुपये भरून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. सिटी सर्व्हेच्या प्रॉपर्टी कार्डवर मनपाचा हक्क नोंदवावा. जागेचे मंडई, मार्केटबाबत आरक्षण कायम ठेवावे. मालमत्ता करातून या रकमेची तजवीज करून जागा ताब्यात घ्यावी.

मनपाकडून पैशांची तजवीज शक्य नसल्यास जिल्हा नियोजन विभागाकडून अपेक्षित निधी आणण्यासाठी प्रयत्न करू. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल आणि आमदार अमरिशभाई पटेल ही दिग्गज मंडळी आपल्या पाठीशी असताना अडीच कोटींचा निधी सहज मिळू शकेल, असा विश्‍वास श्री. रेलन यांनी व्यक्त केला.

वॉल कंपाउंड झाले कसे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कमलेश देवरे म्हणाले, की संबंधित जागेला वॉल कंपाउंड झाले कसे, हा प्रश्‍न आहे. या प्रकरणात काही गैरउद्योग घडत असेल तर त्याला मनपा प्रशासन जबाबदार राहील. जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मनपाचे आरक्षण, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या भूसंपादनाची इतर हक्कात नोंद नाही. हा गंभीर प्रकार आहे. शिवाय जागेबाबत मनपावर २० कोटी रुपयांचा दावा दाखल आहे.

esakal
Nashik News : मालेगावात तोतापुरी कैरीची आवक वाढली! लाखोंची उलाढाल

महापौर, उपमहापौर देवपूर भागातील असताना मोक्याची जागा दुसरा कुणी हिरावत असेल तर ते अशोभनीय ठरेल. या प्रकरणी मनपाने योग्य ती रक्कम भरावी, प्रसंगी जिल्हा नियोजन विभागाकडून निधीची व्यवस्था करावी, अथवा बीओटी तत्त्वावर संकुल साकारून रकमेची तजवीज करावी, असे श्री. देवरे म्हणाले. विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले यांनीही महापालिकेने भूसंपादनातून जागा ताब्यात घेत संकुल उभे करावे, अशी मागणी केली.

विविध भूमिकांची मांडणी

नगरसेवक शीतल नवले म्हणाले, की संबंधित जागेबाबत महापालिकेची चूक नाही. जागा महत्त्वाची असल्याने भूसंपादनाचा झालेला निवाडा महापालिकेने कायम ठेवावा. या प्रकरणात झालेल्या गैरउद्योगाची पाळेमुळे शोधावीत. उपमहापौर नागसेन बोरसे म्हणाले, की भूमाफिया किशोर बाफना यांना संबंधित जागा विक्री झालेली दिसते. उताऱ्यावर मात्र नाव लावलेले नाही.

त्यामुळे महापालिकेसह न्यायालयाची दिशाभूल करण्यात आल्याची तक्रार आहे. नगरसेवक सुनील बैसाणे यांनी या प्रकरणात दिशाभूल केली गेली असेल तर संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, जागेवरील वॉल कंपाउंड काढून टाकण्याचा आदेश द्यावा, मनपाने अडीच कोटी भरून जागा आपल्याकडे वर्ग करावी, अशी मागणी केली.

Jalgaon Politics News : ...या हास्यामागे दडलंय काय? रश्मी ठाकरे, वैशाली सूर्यवंशी यांच्यातील चर्चेकडे लक्ष

महापौर चौधरी यांचा ठोस निर्णय

महापौर चौधरी यांनी महासभेत झालेल्या चर्चेनंतर रुलिंग दिले. ते असे ः धुळे शहराच्या दृष्टीने ४०६०.९ चौरसमीटर जागा महत्त्वाची आहे. देवपूरमध्ये मंडई व व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो. सद्यःस्थितीत जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही झुलेलाल व्यावसायिक संस्थेमार्फत केली आहे.

याबाबत झालेला भूसंपादनाचा निवाडा रद्द करण्याबाबत प्रस्ताव महासभेत सादर झाला आहे; परंतु बेरोजगारीची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेला निवाडा रद्द न करता तो मनपाच्या नावे करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे. त्यासाठी प्रशासनाने उचित कार्यवाही करावी. या प्रकरणाची चौकशी करून फसवणुकीबद्दल दोषींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगांची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

वार्षिक सहा कोटींचे उत्पन्न ः रेलन

नगरसेवक रेलन म्हणाले, की या आरक्षित जागेवर एक लाख चौरसफुटांचे मार्केट साकारावे. त्यासाठी सुमारे वीस कोटींचा खर्च होईल. मात्र, मनपाला दरमहा भाड्यापोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळेल. तीन वर्षांत खर्चाची किंमत वसूल होईल. नंतर मनपाला भाड्यातून दर वर्षी सहा कोटींचे उत्पन्न मिळेल.

यात तळमजल्यावर मंडईसाठी ओटे आणि त्यावर सातमजली संकुल उभारले जावे. या नियोजनाप्रमाणे देवपूरमधील अतिक्रमित व्यावसायिकांचा प्रश्‍न मार्गी लागून रस्ते मोकळे होतील. त्यामुळे अजेंड्यावरील मागणीप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करू नये. आतापर्यंतच्या तीन डीपी प्लॅनमध्ये जागेचे मार्केटसाठी आरक्षण असल्याची नोंद आहे. त्यानुसार मार्केट विकसित करण्यावर भर आणि त्यासाठी ही जागा प्रशासनाने उचित प्रक्रियेतून ताब्यात घेणे गरजेचे आहे.

esakal
Ram Navami 2023 : श्रीराम नवमीचे आज विविध कार्यक्रम; महिलांसाठी बाइक रॅली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com