महापालिकेवरील कारवाई तूर्त टळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

थकीत पाणीपट्टीचा वाद; सिंचन विभागाचा वसुलीसाठी तगादा
धुळे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव व सुलवाडे बॅरेजच्या थकीत बिगर सिंचन पाणीपट्टीपोटी ३२ लाख रुपये अदा करून पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई आज महापालिकेने टाळली खरी पण त्यासाठी महापालिकेला उर्वरित थकबाकी अदा करण्याबाबत लेखी आश्‍वासन द्यावे लागले.

थकीत पाणीपट्टीचा वाद; सिंचन विभागाचा वसुलीसाठी तगादा
धुळे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव व सुलवाडे बॅरेजच्या थकीत बिगर सिंचन पाणीपट्टीपोटी ३२ लाख रुपये अदा करून पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई आज महापालिकेने टाळली खरी पण त्यासाठी महापालिकेला उर्वरित थकबाकी अदा करण्याबाबत लेखी आश्‍वासन द्यावे लागले.

नकाणे तलाव व सुलवाडे बॅरेजच्या बिगर सिंचन पाणीपट्टीपोटी पाटबंधारे विभागाचे महापालिकेकडे एकूण तीन कोटी १५ लाख ६० हजार रुपये थकबाकी होती. ही थकबाकी अदा करावी, यासाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटिसा बजावल्या होत्या. नोटिशीनंतरही थकबाकी न भरणे अत्यंत खेदजनक असल्याचे विभागाने नोटिशीत नमूद केले होते. १५ मार्चला सायंकाळी पाचला नाइलाजास्तव पाणीपुरवठा खंडित केला जाईल व त्यामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला व कायदा सुव्यवस्थेबाबतच्या परिस्थितीला सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील असेही बजावले होते.

३२ लाखांना नकार
पाटबंधारे विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सायंकाळी पाचला पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई लक्षात घेता महापालिकेने ३२ लाखांचा धनादेश अदा करण्याची तयारी दर्शविली. मात्र एकूण थकबाकीपोटी ही रक्कम कमी असल्याने पाटबंधारे विभागाने धनादेश घेण्यास नकार दर्शविला होता. उपायुक्त रवींद्र जाधव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून धनादेश स्वीकारण्याची विनंती केली. पाटबंधारे विभागाने लेखी घेतल्यानंतर ३२ लाख रुपयांचा धनादेश स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

उर्वरित थकबाकीसाठी लेखी
एकूण तीन कोटी १५ लाख ६० हजार रुपये थकबाकीपैकी ३२ लाख ४५ हजार ७०६ रुपये भरण्यात येत आहेत. ५० लाख रुपये २३ मार्चपर्यंत अदा करण्यात येईल व त्यानंतर ३१ मार्चअखेरपर्यंत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम अदा करण्याची कार्यवाही केली जाईल त्यामुळे पाणीपुरवठा खंडित करू नये अशी विनंतीवजा लेखी महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिले. त्यामुळे पाणीपुरवठा बंदची कारवाई आज टळली.

Web Title: municipal crime stop