पाटलांची ‘पाटील’की जैसे-थे राहणार की वाढणार?

विक्रांत मते
सोमवार, 5 डिसेंबर 2016

अमोल, प्रेम उतरणार महापालिकेच्या निवडणुकीत

अमोल, प्रेम उतरणार महापालिकेच्या निवडणुकीत

नाशिक - पक्ष कुठलाही असो पाटील सांगतील तिच दिशा, असे कायम सूत्र राहिलेल्या सातपूरच्या पाटील कुटुंबातील अमोल व प्रेम दोघे चुलत बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील, दिनकर पाटील व लता पाटील प्रत्येकी दोनदा विजयी झाले. आता दिनकर व लता पाटील हे दांपत्य तिसऱ्यांदा नगरसेवक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे पुत्र अमोल हेही रिंगणात उतरणार आहेत. चुलत बंधू प्रेम यांचा पक्ष अजून निश्‍चित नसला, तरी तेही निवडणूक लढविणार आहेत. एकाच कुटुंबातील चार सदस्य यंदाच्या महापालिका निवडणुकीत सातपूर विभागातून लढताना दिसतील. 

सातपूरमधील शिवाजीनगर, गंगापूर पाटील कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत सातत्याने या भागातून पाटील कुटुंबाने विजय मिळविला. १९९२ च्या निवडणुकीत लता पाटील प्रथम अपक्ष म्हणून विजयी झाल्या. १९९७ व २००२ च्या निवडणुकीत दशरथ पाटील शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. २००७ व २०१२ मध्ये दिनकर पाटील काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांनी २०१४ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घेतली व विजयी झाले. २००२ मध्ये शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर दशरथ पाटील यांना महापौरपदाचा मान मिळाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले. त्यात पक्षांतर्गत दगाबाजीमुळे अपयश आले. शिवसेनेत पाटील नावाचा दबदबा वाढल्याने दशरथ पाटील विरुद्ध शिवसेना असे समीकरण तयार झाले. यामुळे श्री. पाटील यांनी नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसची वाट धरली. सध्या ते राजकारणापासून दूर आहेत. स्वत: लढण्याऐवजी दशरथ पाटील नावाचा करिश्‍मा राजकारणात पुन्हा करण्यासाठी पुत्र प्रेम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहेत. पक्ष कुठला याबाबत सध्या तरी श्री. पाटील यांनी मौन राखले आहे. लता व दिनकर पाटील यांनी सातपूर विभागाचे दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. आता स्वत:बरोबरच पुत्र अमोल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. मात्र, पुतण्या प्रेम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास प्रभाग नऊमधून अमोल यांना निवडणूक न लढविण्याची श्री. दिनकर यांची भूमिका आहे.

पाटील कुटुंबाची पोलादी पकड
सातपूर भागातील प्रभाग आठ व नऊमध्ये पाटील कुटुंबाची सत्ता २० वर्षांपासून आहे. सत्तेला अनेकांनी आव्हान दिले. मात्र, अपयशी झाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाटील कुटुंबाला शह देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाटलांची पोलादी पकड ढिली होण्याऐवजी अधिक घट्ट झाली. २०१२ मध्ये सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. प्रभाग सतरामध्ये मैत्रीपूर्ण लढत घेण्याची वेळ आली. त्या वेळी पाटील कुटुंबाला शह देण्यासाठी काँग्रेससह सर्वच पक्ष सरसावले होते. तेथेही विरोधकांना अपयश आले. पाटील कुटुंबातील श्री. दशरथ २००२ मध्ये महापौर होते. महापौरपदाला सर्वाधिक प्रतिष्ठा त्यांनी प्राप्त करून दिली. कार्यकर्त्यांचे जाळे, नातलगांचा गोतावळा, स्थानिक पातळीवर मतदारांशी असलेले संबंध ही पाटील कुटुंबाची ताकद असली, तरी दहशतीच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा आरोपही आहे. या भागात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये पाटील कुटुंबाला विजय मिळाला आहे. विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी पाटील कुटुंबाला अधिक प्रयत्न करावा लागणार आहे.

Web Title: municipal election politics