मनपा अधिकाऱ्यांवर ‘दंडास्त्र’ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

आयुक्त धायगुडेंचा चार अधिकाऱ्यांवर बडगा; काहींना नोटीस

धुळे - कामांची जबाबदारी सोपविलेली असताना हलगर्जीपणा व कामात कुचराई केल्यामुळे कामे होत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी चार अधिकाऱ्यांवर दंडाचा बडगा उचलला आहे. इतर काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा, तर अनुपस्थिती, रजा मंजूर नसताना रजेवर जाणे, कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जागेवर नसणे अशा विविध कारणांमुळेही संबंधितांना नोटिसांसह दंड ठोठावण्यात येत आहे. दोन दिवसांत नऊ अधिकाऱ्यांना ४७ हजार रुपये दंड करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिक, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. शिवाय आंदोलने झाली. १६ मेस महासभेतही सदस्यांनी पाणीप्रश्‍नासह अस्वच्छतेबाबत तक्रारी करत प्रशासनाला धारेवर धरले होते. या एकूणच प्रकारांमुळे महापालिकेची व प्रशासनाची प्रतिमा जनमानसात डागाळली. कामात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केली म्हणून ही परिस्थिती ओढवली, असा ठपका ठेवत काल आयुक्त धायगुडे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कैलास शिंदे यांच्यासह ओव्हरसियर सी. एम. उगले, सी. सी. बागूल, एस. बी. विसपुते, हेमंत पावटे यांना प्रत्येकी पाच हजार असा एकूण २५ हजार रुपये दंड केला. दंड, नोटिसांचे सत्र आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

चार जणांना २२ हजार दंड
आयुक्त धायगुडे यांनी आज सहाय्यक आयुक्त अभिजित कदम, प्रभारी नगररचनाकार पी. डी. चव्हाण, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी नंदू बैसाणे यांना प्रत्येकी पाच हजार, तर सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांना सात हजार असा एकूण २२ हजार रुपये दंड ठोठावला. त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागांशी संबंधित कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत हा दंड करण्यात आला आहे. कदम यांना मालमत्ता कराची देयके वाटप न करणे, चव्हाण यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई, माळी यांना दैनंदिन स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाबाबत हलगर्जीपणा तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाई न केल्याने, तर बैसाणे यांना अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत नियमानुसार कारवाई न केल्याने दंड करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांना रजा मंजूर नसताना रजेवर गेल्याने रजेच्या कालावधीतील त्यांचे वेतन कपातीचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, सहाय्यक आयुक्त कांबळे यांना विविध प्रश्‍नी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘दांडीबहाद्दरां’कडेही लक्ष
आयुक्त धायगुडे यांनी सहाय्यक आयुक्त अनुप डुरे यांना विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांची अचानक पाहणी करून हजेरी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याप्रमाणे डुरे गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध विभागांना अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची हजेरी घेत आहेत. यात काही कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जागेवर नसणे, रजेचा अर्ज नसताना रजेवर जाणे, रजा मंजूर नसताना रजेवर जाणे आदी कारणांनी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांनाही दोनशे ते पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे. श्री. डुरे यांनी आज सुभाष चौकातील मनपा दवाखान्याचीही पाहणी केली.

Web Title: municipal officer fine by commissioner