नकाशात पार्किंग, जागेवर पत्ताच नाही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

जळगाव - शहरात ‘पार्किंग’ची समस्या अत्यंत बिकट बनली असून, पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांच्या बांधकाम नकाशात दाखविलेल्या वाहनतळाचा प्रत्यक्ष जागेवर पत्ताच नसल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे बहुतांश संकुलांमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यांवरच लावत असल्याने आधीच बिकट बनलेल्या वाहतुकीचा मोठाच बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने यासंदर्भात ना महापालिका कारवाई करत ना पोलिसदलाची वाहतूक शाखा. 

जळगाव - शहरात ‘पार्किंग’ची समस्या अत्यंत बिकट बनली असून, पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांच्या बांधकाम नकाशात दाखविलेल्या वाहनतळाचा प्रत्यक्ष जागेवर पत्ताच नसल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे बहुतांश संकुलांमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यांवरच लावत असल्याने आधीच बिकट बनलेल्या वाहतुकीचा मोठाच बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने यासंदर्भात ना महापालिका कारवाई करत ना पोलिसदलाची वाहतूक शाखा. 

वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर महापालिकेने मोठ्या प्रयत्नांना उपाय शोधला. त्यातून शहरातील, विशेषत: बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांनी काही काळ का होईना मोकळा श्‍वास घेतला. वर्ष-दीड वर्ष अतिक्रमणविरोधी मोहीम राबविल्यानंतर हे यश महापालिका प्रशासनाला दिसू शकले. मात्र, शहरातील बेशिस्त पार्किंगच्या बिकट समस्येवर अद्याप महापालिका प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. 

पार्किंग व्यवस्थाच नाही
शहरात पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या मालकीची २२ व अन्य खासगी व्यापारी संकुले मिळून दोनशेवर लहान-मोठ्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी गाळे काढण्यात आले असून, यापैकी ९५ टक्के इमारतींच्या बांधकामात तळमजल्यासह संकुलाच्या हद्दीत वाहनतळ दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्ष जागेवर मात्र कुठलेही वाहनतळ दिसून येत नाही. त्यामुळे या संकुलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावरच बेशिस्तपणे लागलेली असतात. 

...येथे होते कोंडी अधिक
अगदी महापालिका मालकीच्या गांधी मार्केट, चौबे मार्केट व अन्य काही संकुलांमध्येही पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था देण्यात आलेली नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलासमोर तीन-चार खासगी संकुले असून त्या सर्व संकुलांमध्ये तळघरात वाहनतळ केवळ नकाशावर दिसते, प्रत्यक्षात गाळे काढण्यात आले आहेत. या संकुलांमध्ये येणारे सर्व ग्राहक थेट रस्त्यावर वाहने लावतात व वाहतुकीची कोंडी होते. चित्राचौक ते गणेश कॉलनीदरम्यान प्रत्येक १००-२०० मीटर अंतरावर एक-दोन संकुले आढळून येतात, मात्र त्यापैकी कोणत्याही संकुलाने स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गांधी मार्केट, फुले मार्केट, गोलाणी संकुल, कोर्टासमोरील रस्ता, नूतन मराठा महाविद्यालय, शाहूनगर ते थेट गणेश कॉलनी, गोविंदा रिक्षाथांबा, नवे बसस्थानक अशा सर्वच प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.

या उपाययोजना आवश्‍यक
 प्रमुख रस्त्यांवर पार्किंग झोन निश्‍चित करणे
 बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करणे
 जुन्या पालिका इमारतीच्या जागेवर पार्किंग झोन करणे
 जुन्या सानेगुरुजी रुग्णालयाची जागा वापरणे
 वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिस नियुक्त करणे

Web Title: municipal parking map place issue