मारहाणीत चुलत भावाला वाचविताना एकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

तिघांनी एकाला मारहाण केली असता, त्यास भेटण्यासाठी आलेला चुलत भाऊ वाचविण्यासाठी धावला. त्यावेळी संशयिताने धारदार हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तिघांनी एकाला मारहाण केली असता, त्यास भेटण्यासाठी आलेला चुलत भाऊ वाचविण्यासाठी धावला. त्यावेळी संशयिताने धारदार हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला आहे. दिनेश हिरामण जाधव (माळी) असे मृत युवकाचे नाव असून तो नोकरी शोधण्यासाठी नाशिकला आला असता सदरची घटना घडली. 

योगेश अशोक माळी (24, रा. दत्तनगर, कारगिरचौक, सिडको, नाशिक. मूळ रा. दोंदवाड पो. विंचूर ता. जि. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित किरण वाघ व त्याचे दोन साथीदार यांनी रविवारी (ता.1) सायंकाळी एक्‍स्लो पॉंईट परिसरात योगेश माळी याच्याशी बोलत होते. त्यावेळी तिघांनी मागील भांडणाची कुरापत काढली आणि त्याच्या वाद घातला. त्यानंतर तिघांनी योगेश माळी यास मारहाण सुरू केली. त्यामुळे त्याने पळ काढला. तो प्रिसीजन ऑटो कंपनीच्या आतमध्ये पळाला. त्याचा पाठलाग करीत आले. त्यावेळी कंपनीतील काही मित्रही बाहेर आले. तसेच, योगेश माळी यास भेटण्यासाठी आलेला त्याचा चुलत भाऊ दिनेश हिरामण जाधव (माळी) हादेखील थांबलेला होता. तर संशयितांनी पुन्हा योगेश माळी यास मारहाण केली असता, दिनेश जाधव त्याच्या मदतीला धावला. त्यावेळी दोघा संशयितांनी दिनेशला पकडून ठेवले तर किरण वाघ याने त्याच्याकडून धारदार हत्यार दिनेशच्या पोटात भोकसला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. 

गंभीर जखमी दिनेश यास तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, आज (ता.2) सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर अंबड पोलिसांनी याप्रकरणी पहाटेच्या सुमारास प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात वाढीव कलम लावून खुनाचा गुन्हा नोंदविला गेला आहे. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, अंबडचे पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक महेश म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: murder case in nasik