अंत्यविधीनंतर तीन तासात खुनाची कबुली 

दीपक कच्छवा
शनिवार, 7 जुलै 2018

या प्रकरणात संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. अजून दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविले आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल. 
दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कुंझर (ता. चाळीसगाव) येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी अंत्यविधी झाल्यावर अवघ्या तीनच तासात संशयित आरोपी प्रवीण बैरागीने पोलिसांना खुनाची कबुली दिली. या प्रकरणातील धुळे येथील शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही गोपनीय ठेवण्यात आला आहे. तो उपलब्ध होण्याच्या आतच पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे. 

कुंझर येथील विवाहिता प्रियंका रामचरण बैरागी (वय 27) हिने 4 जुलैला सकाळी सातच्यापूर्वी सासरी कुंझरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या घटनेप्रकरणी प्रियंकाच्या मामांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मेहुणबारे पोलिसांनी खून व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. प्रियंकाचा अंत्यविधी काल (5 जुलै) सायंकाळी साडेसहाला कुंझर गावी झाला. 

दोन तासात खुनाचा उलगडा 
धुळे येथील शवविच्छेदन अहवाल अजूनही गोपनीय ठेवण्यात आला आहे. केवळ नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार या प्रकरणाचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवालाची वाट न पाहता, मयत प्रियंकाचा दीर प्रवीण बैरागी याला मेहुणबारे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची न्यायालयातून दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळवली. प्रियंकावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी प्रवीणला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, तो काहीच बोलत नव्हता. मात्र, पोलिसी खाक्‍या दाखवताच प्रवीण पोपटासारखा बोलू लागला. त्याने वहिनीचा खून केल्याची कबुली दिल्याचे तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी सांगितले. या खुनाचा उलगडा करण्याकामी उपनिरीक्षक हेमंत शिंदे, पृथ्वीराज कुमावत, गोपाल पाटील, भागवत पाटील, ताहेर तडवी, रवी पाटील, दत्तू पाटील आदींचे सहकार्य लाभले. 

असा केला प्रियंकाचा खून 
प्रवीण हा घराच्या गच्चीवर झोपलेला होता. घराच्या बाहेरील ओसरीमध्ये त्याची आई लीलाबाई बैरागी व आजेसासू सुमनबाई बैरागी या दोन्ही झोपलेल्या होत्या. प्रियंका ही तिसऱ्या खोलीत पलंगावर झोपलेली होती. त्या रात्री अडीचच्या सुमारास प्रवीण गच्चीवरून खाली आला व सरळ प्रियंका झोपलेल्या खोलीत गेला. प्रियंकाला जाग येताच तिने प्रवीणला हटकले व "काय दादा' असे बोलून कुशी बदलून प्रियंका झोपी गेली. तेवढ्यात प्रवीणने दोरीवर असलेल्या स्कार्फने प्रियंकाच्या गळ्याला फास दिला. त्यामुळे तिचा जीव गेला. प्रवीणने ही घटना लक्षात येऊ नये म्हणून प्रियंकाने गळफास घेतल्याचा बनाव रचला. ही कहाणी प्रवीणने पोलिसांना सांगून "मी अत्याचार केला नाही' असे तो सांगत आहे. मात्र, प्रवीणने अत्याचार केला की नाही हे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणात संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. अजून दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविले आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल. 
दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

Web Title: murder in chalisgaon