भुसावळला भावानेच केला भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना आज मध्‍यरात्री अडीचच्‍या सुमारास गंगाराम प्लॉट भागात  घडली.

भुसावळ - वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना आज मध्‍यरात्री अडीचच्‍या सुमारास गंगाराम प्लॉट भागात  घडली.

स्‍थानिक खडका रोड भागातील बजाज बिल्डिंगशेजारील रहिवासी स्‍वप्नील प्रल्‍हाद पाटील (वय २८) व गंगाराम प्लॉटमधील वाहनचालक योगेश प्रल्हाद पाटील (वय ३२) या दोन्ही सख्ख्या भावांना दारूचे व्यसन होते. यामुळे दोघांच्या पत्‍नी माहेरी निघून गेल्‍या आहेत. वडिलांचा मृत्यू झाला असून, रेल्‍वेत कार्यरत असलेली त्यांची आई बाहेरगावी गेलेली होती. खडका रोड व गंगाराम प्लॉटमधील घरात कुणीही नसताना, काहीतरी कारणावरून या दोघा भावांमध्ये गंगाराम प्लॉटमधील घराच्या पहिल्या मजल्यावर योगेश व स्वप्नील या दोघा भावंडांमध्ये वाद होऊन वाद चव्हाट्यावर गेला. यात लहान भाऊ स्वप्नील याने मोठा भाऊ योगेशच्या गळ्यावर, छातीवर व पोटाच्या एका बाजूला धारदार चाकूने वार केल्‍याने योगेश हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पहाटे पाचच्या  सुमारास गोदावरी हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा भाऊ स्वप्नील प्रल्हाद पाटील (वय २८) यास ताब्यात घेण्यात आले आहे. मृत योगेश याचा मृतदेह नगरपालिका रुग्णालयात आणून डॉ. एस. डी. इंगळे यांनी शवविच्छेदन केले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, दत्तात्रय गुळिंग व सहकाऱ्यांनी भेट देऊन तपासाला सुरवात केली आहे. खून कशामुळे झाला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Crime