जळगावात 'एसआयटी'कडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

जळगाव - कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येप्रकरणाच्या तपासार्थ जळगावात आलेल्या कोल्हापूर व कर्नाटकच्या संयुक्त "एसआयटी' पथकाने आज सलग दुसऱ्या दिवशीही जळगाव शहरासह भुसावळात चौकशी केल्याचे वृत्त आहे. या पथकाने जळगावातील ज्या घरात तपासणी केली, ते एका माजी नगरसेवक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे असून काही तरुणांना ते भाड्याने देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर-कर्नाटकातील संयुक्त "एसआयटी' पथक कालपासून जळगावात अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करीत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासार्थ हे पथक जळगावी आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वीच जिवंत बॉंबसह नालासोपाऱ्यातून ताब्यात घेण्यात आलेला साधक व नंतरच्या हालचाली याचाही या तपासाशी संबंध असल्याचे समजते.

काय आढळले घरात?
या तपास पथकाने काल सकाळी साडेदहा ते सायंकाळपर्यंत कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक नगरात एका बंद घराचे कुलूप उघडून तपासकार्य केले. तपास यंत्रणेला हवे संशयितांचा रहिवास असलेल्या खोलीत अंथरूण-पांघरुणासह, बसण्याचे लाकडी पाट, टेबल, हॅंगर असे साहित्य होते. संबंधित ठिकाणाचे मोबाईल टॉवर नेटवर्किंग आणि इतर तांत्रिक माहितीही या पथकाने संकलित केल्याचे बोलले जाते.

Web Title: Murder Inquiry by SIT in Jalgaon