खामगावातील हत्येचा 24 तासांत उलगडा; गुन्हे शाखेची कारवाई

खामगावातील हत्येचा 24 तासांत उलगडा; गुन्हे शाखेची कारवाई

येवला : खामगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री खडी क्रशरवर सुरक्षारक्षकाची हत्या करून दहा चाकी हायवा ट्रक पळवणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांत मुद्देमालासह पकडले. पाळत ठेऊन कोपरगाव येथील सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केली असून, चोरलेला डंपर विक्री केल्याने चोरीचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांनी पूर्ण केले. यातील आरोपी अमोल पानसरे याच्यावर यापूर्वी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

येथील अविनाश गाडे यांच्या खडी क्रशर साईटवर रात्रीच्या वेळी मोठे हायवा ट्रक उभे असतात, अशी माहिती घेऊन व दिवसा पाहणी करत मध्यरात्रीचे सुमारास सर्व आरोपी कोपरगाव येथून अजय निकम याचे स्विफ्ट डिझायर कारने खामगाव शिवारात खडी क्रशरवर आले. येथील सुरक्षारक्षक तुळशीराम मोतीराम सुरासे (वय ५५) यांनी विरोध केल्याने त्यांनी लाकडी दांडा व लोखंडी टॉमीने पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले.

तसेच त्यांचे हातपाय बांधून घटनास्थळावरील दहा चाकी हायवा ट्रक लुटमार करून पळवून नेला. या मारहाणीत सुरासे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर लुटमार केलेला हायवा ट्रक हा सदर आरोपी हे श्रीरामपूर येथे घेऊन गेले व तो विक्री करून आपसात पैसे वाटून घेणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करत लगतच्या जिल्ह्यात तात्काळ तपास पथके रवाना केली. आरोपींनी दरोडा टाकून नेलेला हायवा ट्रक हा ज्या दिशेने घेऊन गेले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तपास सुरू केला. चोरीची वाहने अवैधरित्या खरेदी-विक्री करणारे लगतचे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरविली.

मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने कोपरगावला रात्रभर सापळा रचून संशयित अजय मारोती निकम, (वय 30,रा. शिरसगाव, ता. कोपरगाव) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे साथीदार आकाश रंगनाथ लोखंडे, (रा.कोकमठाण), अमोल पानसरे (रा. कोकमठाण,ता.कोपरगाव), सचिन खालकर (रा. तळेगाव, ता. संगमनेर),संदिप गायके (रा. इंदिरानगर,कोपरगाव) व मनोज छगन भागवत  (रा.सावळगाव, ता.कोपरगाव) यांच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी संशयित अजय निकम व आकाश रंगनाथ लोखंडे यांना कोपरगावमधून ताब्यात घेतले आहे.

आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट डिझायर कार तसेच जबरीने लुटमार करून नेलेला दहा चाकी हायवा ट्रक (एमएच १४,बीजे ३०५५) असा दहा लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, स्वप्निल नाईक, संदिप कहाळे, अरूण पगारे, रवी शिलावट, रविंद्र वानखेडे, रावसाहेब कांबळे, भरत कांदळकर, राजु सांगळे,प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, संदिप हांडगे, हेमंत गिलबिले, इमरान पटेल, विशाल आव्हाड, संदिप लगड, मंगेश गोसावी, हरिश आव्हाड, गिरीश बागुल, योगेश गुलमाडू यांचे पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com