पिंप्राळ्यात महिलेला चाकूने भोसकले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

जळगाव - पिंप्राळा उपनगरातील शंकरआप्पानगर भागात ४७ वर्षीय गृहिणीला घरात घुसून चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. चाकूने वार होत असताना मदतीसाठी महिला किंचाळत असल्याने गल्लीतील तरुणांनी धाव घेत दार तोडून जखमी महिलेचा जीव वाचविला, तर चाकूने वार करणाऱ्या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी महिला बेशुद्ध असून, रामानंदनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पिंप्राळा उपनगरातील शंकरआप्पानगर परिसरात प्रतिभा प्रदीप पाटील कुटुंबासह भाड्याने वास्तव्यास आहेत. त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर शिवाजी चंदेले यांचे कुटुंबीय राहतात. त्यांचा मुलगा मनोज चंदेले (वय २२) आज साडेसातच्या सुमारास प्रतिभा पाटील यांच्या घरात शिरला.

घरात त्या एकट्याच असताना दोघांमध्ये बाचाबाची होऊन मनोजने स्वयंपाकघरातील चाकूने प्रतिभा यांच्या मानेवर, छातीवर, पोटात व पाठीवर वार केले. चाकूचे वार होत असताना प्रतिभा जिवाच्या आकांताने किंचाळण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेतली. आतून बंद असलेले घराचे दार तोडून प्रतिभा पाटील यांचा जीव वाचवत बाहेर काढत हल्लेखोर तरुण मनोज चंदेले याला पकडून ठेवले. घडल्या प्रकाराबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविल्याने ‘डीबी’च्या कर्मचाऱ्यांसह शरद देसले यांनी संशयितासोबतचा चाकू ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

गर्दीत उलटसुलट चर्चा
जखमी महिला व तिच्यावर चाकूने हल्ला करणारे दोघेही आमदारांच्या नात्यातील असून, दोन्ही कुटुंबे दुमजली घरात वर-खाली वास्तव्याला आहेत. चाकूने वार करणारा मनोज चंदेले हा आज सायंकाळी प्रतिभा पाटील घरात एकट्या असताना शिरला व त्याने मुख्य दाराची कडी आतून लावून घेत दागिने लांबविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केल्याने त्याने स्वयंपाकघरातील चाकूने वार करण्यास सुरवात केली. 

फॉरेन्सिक पथक दाखल 
घटनेची माहिती कळताच निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, दोघांच्या झटापटीचे फोटो, बोटांचे ठसे, केस अशा स्वरूपाचे पुरावे संकलित केले. जखमी महिलेची प्रकृती नाजूक असून, पोलिसांनी जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बेशुद्ध असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांचे पती प्रदीप पाटील यांचे रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Web Title: Murderer Attack on Women Crime