मुथुट फायनान्स दरोडा; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागेना धागेदोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्स दरोडा प्रकरणाला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही नाशिक शहर पोलिसांच्या हाती अद्यापही कोणतेही धागेदोरे लागू शकलेले नाहीत. संशयितांच्या गोळीबारात एकाची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा, योग्य दिशेने पोलिस तपास करत असल्याचा दावा केला जात असला, तरी कोणताही मागमूस लागलेला नाही.

नाशिक - उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्स दरोडा प्रकरणाला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही नाशिक शहर पोलिसांच्या हाती अद्यापही कोणतेही धागेदोरे लागू शकलेले नाहीत. संशयितांच्या गोळीबारात एकाची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा, योग्य दिशेने पोलिस तपास करत असल्याचा दावा केला जात असला, तरी कोणताही मागमूस लागलेला नाही.

गेल्या शुक्रवारी (ता.14) सकाळी साडेअकराच्या सुमारास चार संशयितांनी उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्सच्या कार्यालयात शिरून सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यालयात ऑडिटसाठी आलेल्या मुंबईतील कार्यालयाचे एम. सॅजू सॅम्युअल (वय 29, मूळ. रा. केरळ) यांनी प्रसंगावधान राखत अलार्मचे बटन दाबले. त्यामुळे संशयित आणि सॅजू यांच्या हाणामारी झाली असता, एका संशयिताने गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. पाच गोळ्या लागल्याने सॅजू जागीच कोसळला. घटनेनंतर संशयित पसार झाले. काही सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले असले तरी, घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीही लागू शकलेले नाही. शनिवारी (ता.15) सकाळी आशेवाडीच्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी तीन दुचाक्‍या सापडल्या असल्या तरीही शहर पोलिस अजूनही अंधारात चाचपडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muthoot finance Robbery crime police