चौथीही मुलगीच झाल्याने विवाहितेची अर्भकासह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नगरसुल (जि. नाशिक) - नगरसुल परिसरातील फरताळवाडी येथील एका विवाहितेने चौथ्यांदा मुलगीच झाल्याने तीन ते चार तासांच्या अर्भकासह रेल्वेखाली आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर दोन ते तीनच्या सुमारास घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली. वर्षा रवींद्र गायके (वय 35) असे या विवाहितेचे नाव आहे. त्या पती रवींद्र गायके व साधारण अकरा, नऊ व तीन वर्षे वय असलेल्या तीन मुलींसह फरताळवाडी परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. काल रात्री एकत्र जेवण करून हे कुटुंब रात्री झोपले. मध्यरात्रीनंतर वर्षा यांची प्रसूती होऊन त्यांना चौथीही मुलगीच झाली. त्यानंतर काही वेळाने या नवजात अर्भकासह त्यांनी जवळच असलेल्या औरंगाबाद- मनमाड रेल्वे मार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली. आज पहाटे पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान, गायके दांपत्याला तीन मुलीच असून, चौथीही मुलगीच झाल्याने वर्षा यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. पोलिसांनीही तशीच शक्‍यता व्यक्त केली आहे.
Web Title: nagarsul nashik news suicide