विठूनामाच्या नावाने दुमदुमले सटाणा ; विद्यार्थ्यांनी आषाढीनिमित्त काढल्या दिंड्या

रोशन खैरनार
शनिवार, 21 जुलै 2018

आदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत मुख्याध्यापक के. के. तांदळे व क्रांती अहिरे यांच्या तर दोधेश्वर स्कूलमध्ये मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्मिणी पालखीचे पूजन झाले.

सटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे प्रमुख आकर्षण ठरले.

सर्व शाळांनी दिंडी सोहळ्यातून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी आठला मविप्र संचलित आदर्श शिशु विहार, अभिनव बालविकास मंदिर, दोधेश्वर पब्लिक स्कूल, प्रगती प्राथमिक विद्यालय, नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे मनीबाई माणकलाल अग्रवाल प्राथमिक शाळा, डिव्हाईन इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांतर्फे आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीचे आयोजन केले होते. 

आदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत मुख्याध्यापक के. के. तांदळे व क्रांती अहिरे यांच्या तर दोधेश्वर स्कूलमध्ये मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्मिणी पालखीचे पूजन झाले. दिंडीच्या अग्रभागी ध्वनीक्षेपकावर विठू माउलीची गीते व भजनांची धून वाजत होती. 'विठोबा माझा पंढरी, झाडे लावा घरोघरी', 'झाडे लावा, झाडे जगवा', 'वृक्षवल्ली सोयरे आम्हां वनचरे' असे उद्बोधनात्मक पर्यावरणाचा संदेश देणारे फलक व भगवे झेंडे घेतलेले विद्यार्थी विठूनामाचा गजर करीत उत्साहाने सहभागी झाले होते.

शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या दिंडीचा समारोप शाळेत करण्यात आला. आषाढी एकादशीदिनी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे सर्वानाच शक्य नसते. मात्र अशा पालखी दिंडीतून जणू काही श्री विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन होत असल्याचे मुख्याध्यापक तांदळे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दिंडीत मंगला शेवाळे, मनीषा देवरे, मनीषा सोनवणे, सुप्रिया देवरे, जयश्री निकम, श्रुती पाटील, सविता पगार, शरद गुंजाळ, नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार, स्वप्नील पवार, मनोहरा सुलू, मनिषा सोनवणे, दादा खरे, माधुरी देवरे, मनिषा खरे जयश्री पवार, वर्षा जगताप, दिपक पाटील, राहुल येशी, गोकुळ गोविल, किशोर चव्हाण, प्रतीभा खैरणार, कल्याणी मांडवडे, चित्रा जाधव, तेजस्वी कापडणीस, हर्षाली सावकार, शुभांगी बागड, वर्षा पवार, दामिनी आहिरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. 

संपूर्ण महाराष्ट्र सध्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला असून वरुणराजाने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार बरसत वारकरी व शेतकऱ्यांना सुखमय केले. मात्र बागलाण तालुक्यासह कसमादे परिसरात जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अजूनही धरणे, नद्या कोरडेच आहेत. आषाढी एकादशीच्या दिंडीत विद्यार्थ्यानी पावसासाठी विठ्ठलाला साकडे घातले.

Web Title: In the name of Vitunama Dindya students took Rally