सात-बारा उताऱ्यांमध्ये एकसमानता येणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

नामपूर - राज्यातील विभागांमध्ये सातबारा उतारा लिहण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे. सातबारा उताऱ्यामधील चुकीच्या नोंदीच्या पद्धतीमुळे दावे दाखल होतात. तसेच पीकपाहणीच्या नोंदी वेगवेगळ्या असल्याने कोणत्या पिकांची किती क्षेत्रावर पेरणी झाली आहे, याचीही माहिती नीट उपलब्ध होत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याच्या भूमिअभिलेख विभागाने सातबारा उतारे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलाठ्यांना सूचनाही दिल्या आहेत.

सातबारा उतारा हा जमीन मालकीसंदर्भात महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सातबारा उताऱ्यावर विविध प्रकारच्या नोंदी असतात. सातबारा लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती राज्यात आहेत. त्याचबरोबर राज्यात विविध भागांमध्ये पिकांच्या नोंदी या बोलीभाषेनुसार लिहिल्या जातात. बुलडाणा भागामध्ये ज्वारीला दादर म्हणतात. सातबारा उताऱ्यावर "ज्वारी'ऐवजी "दादर' लिहिले जाते. आणि त्या पिकाचे क्षेत्र लिहले जाते. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र किती याची अचूक आकडेवारी किती हे समजत नाही. असेच प्रकार कापूस, तांदूळ या पिकांच्या बाबतीत घडतात. हे सर्व यामुळे थांबणार असून, कृषी विभागाच्या माहितीनुसार पिकांचे नाव लिहले जाणार आहे.

बिगरशेती जमीन असेल तर सातबारा उतारा वेगळा करणे आवश्‍यक आहे, तर काही सातबारा उतारे वेगळे न केल्याने अशा सातबारा उताऱ्यावर 200 ते 400 नावांची नोंद आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडतो. सातबारा लिहिण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आल्यास बिगरशेतीचे सातबारे उतारे वेगळे होणार असून, या नागरिकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार आहे.

Web Title: nampur nashik news sat bara uatara