नांदगावजवळ गोळीबार अन्‌ पाठलागाचा थरार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नांदगाव/न्यायडोंगरी - नगर जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांत ‘मोक्का’अंतर्गत पोलिसांना हव्या असलेल्या तिघा फरारी आरोपींना शनिवारी (ता. २७) न्यायडोंगरी, जळगाव बुद्रुक व माणिकपुंज शिवारात नाट्यमयरीत्या पाठलाग करून अटक करण्यात आली. नगर व नाशिकच्या पोलिस पथकांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईदरम्यान जळगाव बुद्रुकला गोळीबारही झाला. 

नांदगाव/न्यायडोंगरी - नगर जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांत ‘मोक्का’अंतर्गत पोलिसांना हव्या असलेल्या तिघा फरारी आरोपींना शनिवारी (ता. २७) न्यायडोंगरी, जळगाव बुद्रुक व माणिकपुंज शिवारात नाट्यमयरीत्या पाठलाग करून अटक करण्यात आली. नगर व नाशिकच्या पोलिस पथकांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईदरम्यान जळगाव बुद्रुकला गोळीबारही झाला. 

शनिवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास न्यायडोंगरी येथे श्री. कोकाटे यांच्या गॅरेजसमोर बॅटरीच्या चौकशीसाठी नव्या कोऱ्या पल्सर व स्प्लेंडरवरून तिघे आले. या गाड्यांना नंबरप्लेटही नव्हत्या. त्यानंतर थोड्या वेळात सफेद तवेरा (एमएच १२- ३३२४) व त्यापाठोपाठ आणखी एक नंबर नसलेली स्विफ्ट कार येऊन थांबली. त्यातून आठ ते दहा जणांनी तेथे उतरताक्षणी बाइकस्वारांवर अक्षरशः झडप घातली. अचानक उद्‌भवलेल्या या अनाहूत प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेले सगळेच गांगरून गेले. त्या वेळी झालेल्या झटापटीत बाइकवरील तिघांपैकी दोघे नांदगाव रस्त्याकडील खंडेराव मंदिराच्या दिशेने पळू लागले अन्‌ त्या ठिकाणी सिनेस्टाइल पाठलाग सुरू झाला. हा सर्व प्रकार बघण्यासाठी तेथे मोठी गर्दी जमा झाली होती. त्या वेळी तवेरातील एका तरुणाने पळणाऱ्या दोघांवर पिस्तूल रोखून थांबण्याचे आवाहन करताच, धावणाऱ्या तरुणाने धारदार कोयता काढून हवेत फिरवत दहशत निर्माण केली व गर्दीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गावातील तरुण व तवेरातून आलेल्यांनी गल्लीबोळांतून जवळपास एक किलोमीटर पाठलाग करीत त्याला पकडले. सुरवातीला ऊसतोड मजूर व त्यांना घ्यायला आलेले मुकादम यांच्यातच काहीतरी घडले असावे, असा सर्वांचा समज झाला. मात्र, त्या वेळी तवेरामधून आलेल्यांनी आपले ओळखपत्र झळकावत, ते नगरचे पोलिसपथक असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर ग्रामस्थही त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी पळणाऱ्या दोघांना थोड्याच अंतरावर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पकडलेले तिघेही ‘मोक्कां’तर्गत पोलिसांना हवे असलेले फरारी आरोपी असल्याचे नंतर निष्पन्न झाले. खंडणी, खून व अन्य गंभीर गुन्ह्यात ते पोलिसांना हवे असल्याने नगर पोलिस त्यांच्या मागावर होते. या टोळीत पाच जणांचा समावेश असून, ते न्यायडोंगरी परिसरात आल्याची माहिती नगरच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. फरारी आरोपी राहाता तालुक्‍यातील आहेत. दीपक पोकळे (वय २५, रा. लोहारे), रामनाथ मोरे (२५, रा. पिंपळवाडी) व अनिल शिंदे (वय १९, रा. पुणतांबा), अशी त्यांची नावे आहेत. दोन महिन्यांपूर्वी शिर्डी येथील खुनाच्या प्रकरणात दीपक पोकळे पोलिसांना हवा होता.

दरोड्याचे साहित्य जप्त
विविध गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला दीपक पोकळे व त्याचे चार सहकारी न्यायडोंगरी भागात दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती नगरच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या वेळी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोरी, मिरचीपूड, चाकू, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, पल्सर व स्प्लेंडर दुचाकी, असे साहित्य हस्तगत केले. आणखी दोघे पळून गेले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तीन शिवारात एकाच वेळी...
न्यायडोंगरी येथे हा थरार सुरू असताना, त्याच वेळी जळगाव बुद्रुक व माणिकपुंज शिवारातही असाच थरार सुरू होता. या ठिकाणी नांदगाव पोलिसांचे पथक याच टोळीतील चौथ्या संशयिताला पकडण्यासाठी गेले होते. 

दरम्यान, माणिकपुंज धरण परिसरात स्प्लेंडरद्वारे पळून जात असलेल्या दीपक पोकळेची नांदगाव व नगर पोलिसांनी दोन बाजूंनी कोंडी केली. त्या वेळी स्विफ्ट डिझायरचा धक्का बसल्याने त्याची स्प्लेंडर खाली पडली. मात्र, तरीही तो उठून पळाला. तो रस्ता सोडून धावत असल्याने पोलिसांनी पायी पाठलाग सुरू केला. या वेळी पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्यावर त्याने गोळीबार केला. त्यामुळे त्यांनीही सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून काही राउंड त्याच्यावर झाडले. या वेळी पाय मुरगळल्याने श्री. शेख जखमी झाले. त्या वेळी औरंगाबाद रस्त्याने येत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे व त्यांचे तीन सहकारी निळे कपडे घातलेला तरुण पळत येत असल्याचे बघून झाडामागे लपले व तो जवळ येताक्षणी त्यांनी झडप घालून पोकळेला पकडले. 

पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, रोहिदास पवार, उपअधीक्षक सागर पाटील, तसेच शिर्डी, श्रीरामपूर व नांदगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Web Title: nandgaon nashik news firing crime