विक्री वाढीसाठी दारूला महिलांची नाव द्यावीत: गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास आज प्रारंभ झाला. त्यास महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली.

शहादा : दारू उत्पादनांना महिलांची नावे दिल्यानंतर त्यांची बाजारात विक्री हमखास वाढते. म्हणून सातपुडा साखर कारखानानिर्मित महाराजा मद्याची विक्री वाढविण्यासाठी व्यवस्थापक मंडळाने त्याचे नामकरण "महाराणी' असे करावे, असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी येथे दिला. 

सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास आज प्रारंभ झाला. त्यास महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प असून, मद्याची विक्री मात्र कमी होत असल्याचे सांगितले. तो धागा पकडत मंत्री महाजन यांनी हा अजब सल्ला दिला. 

ते म्हणाले, की राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव भिंगरी आहे; तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ज्युली आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे, त्यांची विक्री अधिक होते. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर, हे गुटख्याचे प्रकार बंदी असतानाही विकले जातात. तसेच, सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढविण्यासाठी "महाराजा'ऐवजी "महाराणी' असे नामकरण करावे.

Web Title: Nandurbar news Girish Mahajan statement on liquor