esakal | नंदूरबार: भजनी मंडळींची गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

तोरणमाळ घाटातील सिंदीदिगर गावाजवळ खडकी घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रूजर मोटार दरीत कोसळुन 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.

नंदूरबार: भजनी मंडळींची गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार- तोरणमाळ घाटातील सिंदीदिगर गावाजवळ खडकी घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रूजर मोटार दरीत कोसळुन 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, जवळपास १२ प्रवासी जखमी झाले आहेत. परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने आणि सायंकाळनंतर अंधारामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. मृत व जखमी हे बडवानी (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. भजन मंडळीचा कार्यक्रम करण्यासाठी 26 जण एका वाहनाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे येत होते.

रविवारी सायंकाळी सिंदीदिगर घाटातून क्रुझर मोटार सुमारे २6 प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर व अपघाती वळण असलेल्या या घाटात ब्रेक फेल झाल्याने गाडी दरीत कोसळली. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज येताच चालकाने ओरडा केला. त्यामुळे काही जणांनी गाडीतून उड्या घेत स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते जखमी झाले. ज्यांना उडी मारणे शक्य झाले नाही, असे आठ जण गाडीसह दरीत कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांचा मदतीने मदत कार्य सुरू केले.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

सहा महिन्यांत दुसरा अपघात

या भागात नुकताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. सहाच महिन्यांत या रस्त्यावरील हा दुसरा भीषण अपघात आहे. हा सगळा भाग मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

loading image