कटू प्रसंगात नारायणगिरी महाराज फाउंडेशनने केली उपचारासाठी मदत

nashik
nashik

येवला - कुणावर कधी कुठले संकट येईल याचा नेम नसतो. चहूबाजूने संकटे आल्यावर काय दुःखद परिस्थिती निर्माण होते हे निफाड तालुक्यातील देवगाव येथील मेमाणे कुटुंबाकडे बघितल्यावर कळून येते. एकीकडे पत्निला झालेल्या ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराशी सामना करीत असताना मुंबईत उपचार घेताना गावाकडे लहानग्या मुलाचे झालेले निधन या दोन्ही दुःखमय परिस्थितीत उपचारासाठी पैशाची उणीव भासत असताना नाशिक येथील नारायणगिरी महाराज फौंडेशनने लाख रुपयांची मदत मातेला करीत आजच्या समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

निफाड तालुक्यातील देवगाव येथील ज्ञानेश्वर शिवाजी मेमाणे या एका ट्रक चालकाच्या पत्नीला अचानकपणे कॅन्सर या दुर्धर आजाराचे निदान झाले. घरी एक गुंठाही जमीनीचा तुकडा नसल्याने ट्रक चालकाची नोकरी करीत कटुंबाच्या गाडा ज्ञानेश्वर मेमाणे चालवत होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने व अंगावर पत्नीसह तीन मुलांची जबाबदारी पार पाडत असताना ज्ञानेश्वर यांची पत्नी मनीषा हिला कॅन्सरचा आजार जडला. परिस्थिती नसल्याने मुंबई येथील 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल' येथे मनीषास दाखल करण्यात आले असून हॉस्पिटल प्रशासनाने सुमारे ८ लाख रुपयांचा खर्च उपचारासाठी आगामी सहा महिन्यांसाठी दिला आहे. मुंबईत पत्नीच्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी ज्ञानेश्वर सामाजिक संस्था, संघटनांकडे मदतीची याचना करीत फिरत असतांनाच नुकताच १ जुलै रोजी ज्ञानेश्वर व मनीषा यांचा लहानगा मुलगा  साहिल या आठ वर्षाच्या मुलाचे आकस्मिकरित्या शेंगदाणा अन्ननलिकेत अडकल्याने झोपेतच निधन झाले. ब्लड कॅन्सर या आजाराशी सामना करीत असताना लहान मुलाच्या निधनाने मेमाणे कुटुंबावर तर आणखीनच शोककळा पसरली आहे.याही परिस्थितीत ज्ञानेश्वर यांनी आपल्या पत्नीला मुंबई येथील टाटा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून आर्थिक मदतीची गरज या कुटुंबाला आहे. सदर घटनेची माहिती नारायनगिरी महाराज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भागवत यांना समजताच त्यांनी शुक्रवारी नासिक येथे ज्ञानेश्वर मेमाणे यांना संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत धनादेशाद्वारे दिली आहे. सदरची आर्थिक मदत ही उपचाराच्या खर्चाच्या मानाने कमी असली तरी इतर सामाजिक संस्थांकडूनही मदत मिळवून देन्याचे आश्वासन विष्णू भागवत यांनी यावेळी धनादेश देतांना दिले आहे.नारायनगिरी महाराज फौंडेशनचे पदाधिकाऱ्यांसह यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, ज्ञानेश्वर भागवत, सचिन दरगुडे, मराठा क्रांती मोर्चा समनव्यक अस्मिता देशमाने, अविनाश गाडे, अनिल दारुंटे, राजेंद्र घोरपडे, बाबासाहेब आहेर, जगताप, शैलेश माळी, प्रेमचंद महाजन, साहेबराव भागवत, विलास कुरे आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर मेमाणे यांच्या कुटुंबावर दुहेरी संकट आलेले असताना सामाजिक जाणीव ठेऊन मेमाणे कुटुंबाला ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे. यापूर्वीही संस्थेच्या वतीने गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संकटप्रसंगी मदत केलेली आहे.
 - विष्णू भागवत, अध्यक्ष, नारायणगिरी महाराज फौंडेशन, नासिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com