नाशिक : ऑगस्टपासून दोन वेळा पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरल्याने आज रीतिरिवाजाप्रमाणे नारळ वाढवून पूजन करण्यात आले. पावसामुळे धरण भरण्याची आशा असल्याने पुढील महिन्यापासून नागरिकांना सुरळीत दोन वेळा पाणीपुरवठा करणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले.
 

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरल्याने आज रीतिरिवाजाप्रमाणे नारळ वाढवून पूजन करण्यात आले. पावसामुळे धरण भरण्याची आशा असल्याने पुढील महिन्यापासून नागरिकांना सुरळीत दोन वेळा पाणीपुरवठा करणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले.
 

सिडकोतील नगरसेविका कांचन पाटील व नामदेव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, पश्‍चिम प्रभाग समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, माकपचे गटनेते ऍड. तानाजी जायभावे, मनसेचे गटनेते अनिल मटाले, नगरसेवक उद्धव निमसे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र महाले, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी आदी उपस्थित होते. महापालिका स्थापन झाल्यापासून धरण भरल्यानंतर विधिवत पूजन करण्याची प्रथा आहे. 2012 व 2015 मध्ये अपुऱ्या साठ्यामुळे पूजा झाली नाही. यंदा प्रथमच जुलै महिन्यात धरणाची पूजा करण्यात आली. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर धरणाची पाण्याची पातळी एकदम वाढली. त्यातून आतापर्यंत 68 टक्के धरण भरले आहे. साधारण 90 टक्के धरण भरल्यानंतर पूजन केले जाते; परंतु यंदा धरणाने तळ गाठल्याने जुलैअखेर पाणी पुरते की नाही, अशी शंका होती. मात्र चार दिवसांच्या मुसळधारेतच धरण भरल्याने त्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पूजन करण्यात आले.

पाणीकपात होणार रद्द
धरणात पाणी असूनही मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने अपुरा साठा पुरवून वापरण्यासाठी दिवसातून 25 ते 30 टक्के व दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीकपात करण्यात आली होती. गेल्या आठवड्यातील मुसळधारेने दुष्काळ पळवून लावल्याने तातडीने गुरुवारची पाणीकपात मागे घेण्याची घोषणा झाली. पुढील आठवड्यात महासभा होणार आहे. त्यात नगरसेवकांच्या भावना विचारात घेऊन उर्वरित कपात मागे घेण्याची घोषणा करणार असल्याचे महापौर मुर्तडक यांनी सांगितले.

भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांची पाठ
भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज गंगापूर धरणातील जलपूजनाकडे पाठ फिरविली. महापौर कार्यालयातून सर्व गटनेते, नगरसेवकांना दूरध्वनीवरून पूजेचे निमंत्रण देण्यात आले. बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनी उपस्थिती लावली. त्यातही भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. आगामी महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देणार असल्याने पाण्यावरून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने स्वतंत्र भेट देऊन पाहणी करण्याचे नियोजन केल्याची चर्चा असल्याने मनसेकडून घाईघाईने कार्यक्रम उरकून घेतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Nashik: August, twice the water supply