"कालिदास'मुळे शहराला सांस्कृतिक ओळख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती बांधून होत नाही, तर शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे असते. नाशिकला कलावंतांची खाण आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना वाव मिळेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

नाशिक - शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती बांधून होत नाही, तर शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे असते. नाशिकला कलावंतांची खाण आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना वाव मिळेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

शालिमार येथे स्मार्टसिटी योजनेतून सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, आयुक्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते संभाजी मोरुस्कर, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, प्रभाग सभापती वैशाली भोसले, नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, शाहू खैरे, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी उपस्थित होते. कीर्ती शिलेदार, श्री. कांबळी, मुंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. कवी किशोर पाठक, सदानंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शाहू खैरे यांनी आभार मानले. 

"अहो बाळासाहेब, गमतीने बोललो' 
स्मार्टसिटीविषयी सविस्तर भाषण आयुक्तांनी केल्यानंतर जोपर्यंत शहराचा कायापालट होत नाही तोपर्यंत मुंढेसाहेब नाशिकमधून तुम्हाला सोडणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले. तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. मात्र लगेच पालकमंत्र्यांनी आमदार बाळासाहेब सानपांकडे बघत "अहो, बाळासाहेब मी गंमत करत आहे,' असे बोलल्यावर सभागृहात हशा पिकला. 

मनसेची गांधीगिरी 
कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाच्या कामास मनसेच्या काळात मंजुरी दिल्याचे मनसेचे म्हणणे होते. राजकीय श्रेयवादामुळे मनसेला डावलल्याने त्यांनी पालकमंत्र्यांसह कार्यक्रमाला येणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मनसे कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश पवार, मनसेच्या नगरसेविका वैशाली भोसले व पश्‍चिम विभाग निरीक्षक सचिन भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावर पालकमंत्री म्हणाले, की सत्ता बदलत राहते. काम तुम्ही सुरू केले. जो सत्तेवर असतो तोच उद्‌घाटन करतो त्यामुळे मानपानाचा काही प्रश्‍न नाही, असे सांगत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: nashik city cultural identity due to Kalidas