"गंगापूर'मध्ये गाळ वाढल्याने नाशिकला पुराचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

धरणात किती गाळ वाढला, याची मोजदाद झालेली नाही. त्यामुळे अल्प ते मध्यम पावसातही धरण पूर्ण भरते. पाणी सोडताना पाण्याचा हिशेब लावून सोडले जाते. मात्र, गाळाचा अंदाज येत नसल्याने उन्हाळ्यात धरण कोरडे पडून शहरात पाणीटंचाई होते

नाशिक - शासनाने गाळमुक्त धरणाच्या उपक्रमाला सुरवात केली असली, तरी लहान स्वरूपाच्या अनेक कामांवर ताकद खर्च करण्यापेक्षा गंगापूरसारख्या मोठ्या धरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गोदावरीच्या पुराचा धोका वाढत असून, त्यावर उपाय काढण्यासाठी गाळाबाबत नियोजन करणे आवश्‍यकच आहे. असा सूर जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांनी काल (ता. 13) घेतलेल्या बैठकीत उपस्थित आमदारांनी आळविला.

एकट्या गंगापूर धरणात 40 टक्‍क्‍यांहून अधिक गाळ आहे. त्यामुळे तुकड्या-तुकड्यात, गावागावांत गाळ काढण्यासाठी ताकद खर्च करण्यापेक्षा एकत्रित स्वरूपात धरणातील गाळ काढण्यावर भर दिला जावा. पाण्याचे आवर्तन सोडताना पाणी मोजून सोडले जाते. पण, साचणाऱ्या गाळाची मोजदाद करणारी यंत्रणाच नाही. परिणामी, 100 ते 125 टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस पडूनही नाशिककरांना पाण्यासाठी वणवणच करावी लागत आहे.

पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गंगापूर धरणात 28 ते 29 टक्के गाळ असल्याचे आढळले होते. पंधरा वर्षांत 35 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत हा गाळ वाढल्याचा अंदाज आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 5.62 हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) आहे. मेरी संस्थेच्या 2002 च्या अहवालानुसार गंगापूर धरणात 43.75 दशलक्ष घनमीटर गाळ साचला होता. त्यानंतर धरणात किती गाळ वाढला, याची मोजदाद झालेली नाही. त्यामुळे अल्प ते मध्यम पावसातही धरण पूर्ण भरते. पाणी सोडताना पाण्याचा हिशेब लावून सोडले जाते. मात्र, गाळाचा अंदाज येत नसल्याने उन्हाळ्यात धरण कोरडे पडून शहरात पाणीटंचाई होते. नदीपात्राची पातळी खाली असल्याने पावसाळी पाणी, नैसर्गिक नाल्याचे पाणी, पावसाळी गटारीचे पाणी नदीत येते. पुराचा प्रश्‍नही गंभीर होत आहे.

Web Title: Nashik faces flood threat