नाशिक : वर्षांत शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचा फटका

महेंद्र महाजन
सोमवार, 17 एप्रिल 2017

कीडरोगाने शेतकऱ्यांच्या नाकात दम आल्याने डाळिंबाच्या बागा तोडल्या आहेत. त्यामुळे आता डाळिंबाचे क्षेत्र ३५ हजार हेक्‍टरपर्यंत कमी झाले आहे. हेक्‍टरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना ८० रुपये किलो भावाची अपेक्षा होती. डाळिंबाच्याही बाबतीत अपेक्षेपेक्षा निम्मा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार ८०० कोटींवर पाणी सोडावे लागले.

नाशिक : जिल्ह्यातील बहाद्दर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कांद्याचे उत्पादन सव्वा ते दीडपटीने वाढविले. त्यामुळे उत्पादनाचे ‘रेकॉर्ड’ उत्पादन झाले. मात्र बाजारपेठेतील चढ-उतार, सरकारी धरसोड, नोटाबंदीचा फटका, तसेच एकूण शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित उत्पन्न पडलेले नाही. वर्षभरात शेतकऱ्यांना तब्बल दहा हजार कोटींचा दणका बसल्याचे अनुमान आहे. द्राक्षे, डाळिंबाच्या फळबागा अन्‌ कांदा, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या कृषिसंपन्न जिल्ह्यावर शेतकरी आत्महत्यांचा डाग बसलाय. 

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दोन हजार ८०० कोटींची ‘मार्चएंड’ला वसुली अपेक्षित होती. प्रत्यक्षात १५७ कोटींची वसुली झाली आहे. म्हणजेच, उरलेले दोन हजार ६४३ कोटी शेतकऱ्यांना बाजारभावातील घसरणीने बसलेल्या दणक्‍यामुळे भरणे शक्‍य झालेले नाही. दरम्यान, जिल्ह्यात द्राक्षांचे क्षेत्र सव्वा लाख एकरपर्यंत असून, एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा द्राक्ष उत्पादनासाठी अनुकूल हवामान राहिल्याने मागील तीन वर्षांतील नैसर्गिक आपत्तीच्या तोट्यातून सावरण्याची नामी संधी शेतकऱ्यांना चालून आली होती. सर्वसाधारणपणे चाळीस रुपये किलो भावाने द्राक्षे विकली जावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण तसे घडण्याऐवजी अपेक्षेपेक्षा निम्म्या भावाने द्राक्षे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकूण उत्पादन आणि भावाची तुलना केल्यावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खिशाला बसलेला दणका तीन हजार कोटींपर्यंत पोचला आहे. हे कमी काय म्हणून दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करत उपलब्ध पाण्याचा वापर करून डाळिंबाच्या बागा फुलविल्या होत्या.


कीडरोगाने शेतकऱ्यांच्या नाकात दम आल्याने डाळिंबाच्या बागा तोडल्या आहेत. आता डाळिंबाचे क्षेत्र ३५ हजार हेक्‍टरपर्यंत कमी झाले आहे. हेक्‍टरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना ८० रुपये किलो भावाची अपेक्षा होती. डाळिंबाच्याही बाबतीत अपेक्षेपेक्षा निम्मा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार ८०० कोटींवर पाणी सोडावे लागले.


टोमॅटो, पालेभाज्या, बटाटा, वांगी, मिरची, भेंडी याची लागवड सव्वा ते दीड लाख हेक्‍टरवर होते. सरासरी दहा रुपये किलो भावाची शेतकऱ्याची अपेक्षा असताना पाच रुपयांवर समाधान मानावे लागले. त्यातून शेतकऱ्यांना एक हजार २५० कोटींवर पाणी सोडावे लागले. हे कमी म्हणून शेतीचा पूरक असलेला पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योगाचे रूप दिलेल्या कुक्कुटपालन क्षेत्राची अवस्था याहून वेगळी नाही. नोटाबंदीच्या काळात २५ टक्‍क्‍यांनी धंदा बसला होता. आता मंदीच्या काळात १५ टक्‍क्‍यांनी भावात घसरण झाली आहे. त्यामुळे अगोदरच तोट्यात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्चाएवढे पैसे मिळणे मुश्‍कील बनले आहे.

कांद्याने आणले डोळ्यात पाणी
कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. वर्षभरामध्ये सरकारला ठोस भूमिका घेता न आल्याने बाजारपेठांमध्ये कांद्याचे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यातच पुन्हा नैसर्गिक आपत्तीत कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या घोषणांचे सत्र सरकारने सुरू ठेवले. पण अद्याप शेतकऱ्यांपर्यंत दमडी पोचलेली नाही. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सव्वा लाख हेक्‍टरवर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हेक्‍टरी २५ ते ३० टनांपर्यंत शेतकरी उत्पादन घेतात. शेतकऱ्यांना आठ हजार रुपये टनापर्यंत भाव अपेक्षित होता. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांचे दीड हजार कोटी बुडाले आहेत. शेतकऱ्याने कांद्याचे उभे पीक पेटवून आत्महत्येची परवानगी मागण्यापर्यंत कांदा उत्पादकांची निराशा पोचली. 

Web Title: Nashik farmers faced losses of Rs 10000 crores