नाशिक पदवीधर संघासाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

उत्तर महाराष्ट्रात 353 केंद्रावर मतदान, अडीच लाखांवर मतदार
धुळे - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्या (ता. 3) उत्तर महाराष्ट्रातील 353 मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. अडीच लाखांवर मतदार असलेल्या या मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत.

उत्तर महाराष्ट्रात 353 केंद्रावर मतदान, अडीच लाखांवर मतदार
धुळे - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्या (ता. 3) उत्तर महाराष्ट्रातील 353 मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. अडीच लाखांवर मतदार असलेल्या या मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत.

मतदारसंघातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगरमधील महसुली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदानासंबंधी प्रक्रियेचा आढावा घेतला. धुळे जिल्ह्यात 33, नंदुरबार 16, जळगाव 41, नगर 127 आणि नाशिक जिल्ह्यात 136 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी एकूण दोन लाख 56 हजार 472 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी आणि साहित्य दुपारनंतर रवाना झाले. कॉंग्रेस आघाडी व टिडीएफचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील आणि कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले यांच्यासह इतर 14 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकला सोमवारी (ता. 6) अंबड येथे सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

मनाई आदेश लागू
निवडणुकीसाठी धुळे व साक्री तालुक्‍यातील संबंधित 17 मतदान केंद्र परिसरात मनाई आदेश लागू झाल्याची माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली. त्या मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करू नये, असे आवाहन आहे.

ओळखपत्र सोबत ठेवावे
मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे. ते नसेल त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योगसंस्थेने दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र, बॅंक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक (खाते 31 डिसेंबर 2016 ला किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे) आदींसह एकूण 13 पैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवावा, असे निवडणूक यंत्रणेचे आवाहन आहे.

मतदारसंघात एकूण मतदार
नाशिक..........96136
नगर..............85565
जळगाव.........34442
धुळे.............25422
नंदुरबार.........14907
एकूण............2,56,472

Web Title: Nashik graduates constituency today voted