महामोर्चासाठी नाशिकमध्ये उसळला भीमसागर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नाशिक - दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ऍट्रॉसिटी) कठोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे, तळेगाव घटनेची "सीबीआय' चौकशी करा या प्रमुख मागण्यांसाठी डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी शनिवारी काढलेल्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या महामोर्चामुळे नाशिकमध्ये जणू भीमसागर उसळला होता. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

नाशिक - दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ऍट्रॉसिटी) कठोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे, तळेगाव घटनेची "सीबीआय' चौकशी करा या प्रमुख मागण्यांसाठी डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी शनिवारी काढलेल्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या महामोर्चामुळे नाशिकमध्ये जणू भीमसागर उसळला होता. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

अत्यंत शिस्तबद्ध व शांततेने निघालेल्या या मोर्चात पाच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. नाशिक जिल्ह्यात मागील महिन्यात तळेगाव येथील बलात्काराच्या घटनेनंतर उसळलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर निघालेल्या या मोर्चाने स्वयंशिस्तीचे पालन केले. गोल्फ क्‍लब मैदान दुपारी बाराला गर्दीने फुलून गेले होते. दक्षिण दरवाजाने मोर्चाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेला चित्ररथ अग्रभागी होता. जल्हाधिकारी कार्यालयात युवतींनी निवेदन दिल्यानंतर गोल्फ क्‍लब येथेही काही युवतींनी आंबेडकरी चळवळीतील गाणी सादर केली, तसेच भाषणे करून मोर्चाची भूमिका मांडली.
समता सैनिक दलाचे हजारांवर स्वयंसेवक मोर्चाचे नियोजन करीत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मानवी साखळी करून मोर्चातील ते अडथळा दूर करीत असल्यामुळे पोलिसांना वाहतूक नियोजनाच्या पलीकडे खास काम नव्हते. मोर्चेकऱ्यांना ठिकठिकाणी नागरिकांनी पिण्यासाठी पाणी, नाश्‍ता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

गैरवापर करणाऱ्यांना शिक्षा करा
'ऍट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती व जमातीसाठी कवच कुंडले आहे. हा कायदा असूनही एवढ्या मोठ्या संख्येने जातीय द्वेषातून अत्याचार केले जात आहेत. हा कायदा नसला, तर किती अत्याचार होतील, याचाही विचार करा व नंतर हा कायदा रद्द करण्याची मागणी करा, अशी भूमिका गोल्फ क्‍लब येथे जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायासमोर युवतींनी मांडली. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसा अपवादाने या कायद्याचा गैरवापर होतही असेल, हे मान्य करून या गैरवापर करणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणीही युवतींनी या वेळी केली.

तीच शिस्त, तसेच नियोजन
अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती या नावाने नाशिकमध्ये निघालेल्या या मोर्चाच्या आयोजकांनी दोन महिन्यांपूर्वी निघालेला मराठा क्रांती मोर्चा डोळ्यांसमोर ठेवून नियोजन केल्याचे पदोपदी दिसत होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक युवकांनी मी भारतीय.. प्रथमतः व अंतिमतःही असे ठळकपणे लिहिलेले टी शर्ट परिधान केले होते. स्वयंसेवक मानवी साखळीद्वारे मोर्चातील अडथळे दूर करणे, मोर्चाच्या अग्रभागी महिला असणे, केवळ युवतींनीच भाषण करणे, जिल्हाधिकाऱ्यांनाही युवतींनीच निवेदन देणे, मोर्चात कुठल्याही घोषणा न देणे, रस्त्यात मोर्चेकऱ्यांकडून सांडलेला कचरा स्वयंसेवकांनी गोळा करणे या चांगल्या गोष्टींचे अनुकरण मोर्चेकऱ्यांनी करून स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले.

Web Title: Nashik mahamorcala for atrocity