स्थायी, विषय समित्यांत पंचवटीला झुकते माप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

विषय समित्यांचे नवनियुक्त सदस्य
महिला व बालकल्याण समिती - भाजपच्या पूनम सोनवणे, मीरा हांडगे, प्रियंका घाटे, इंदुमती नागरे, हेमलता कांडेकर, शिवसेनेच्या सीमा निगळ, रंजना बोराडे, हर्षा बडगुजर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन.

शहर सुधार समिती - भाजपच्या शांता हिरे, डॉ. सीमा ताजणे, सुरेश खेताडे, छाया देवांग, अनिल ताजनपुरे, शिवसेनेचे भागवत आरोटे, सुदाम डेमसे, 
डी. जी. सूर्यवंशी. काँग्रेसचे राहुल दिवे.

वैद्यकीय व आरोग्य समिती - भाजपच्या पूनम धनकर, अंबादास पगारे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्‍याम बडोदे, अर्चना थोरात, शिवसेनेचे रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले. काँग्रेसच्या आशा तडवी.

विधी समिती - भाजपच्या अनिता सातभाई, रूची कुंभारकर, नीलेश ठाकरे, रवींद्र धिवरे, राकेश दोंदे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी. जी. सूर्यवंशी. राष्ट्रवादीच्या शोभा साबळे.

नाशिक - स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची नियुक्ती करताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी भागाला अधिक झुकते माप दिल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करताना व त्यातही सभापतिपदाचे दावेदारही पंचवटीचेच असल्याने संतापात अधिक भर पडली आहे. कमलेश बोडके, गणेश गिते व उद्धव निमसे हे तिघेही सभापतिपदाचे दावेदार तयार झाल्याने अन्य भागात नगरसेवक आहेत की नाहीत, असा सवाल नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थायी समितीच्या एका सदस्यासह महिला व बालकल्याण, शहर सुधार समिती, वैद्यकीय व आरोग्य समिती, तसेच विधी समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (ता. ९) महासभा बोलावली होती. स्थायी समिती सदस्याच्या एका जागेसाठी आमदार बाळासाहेब सानप समर्थक कमलेश बोडके यांचे नाव जाहीर केल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यापूर्वी पंचवटी विभागातील गणेश गिते सभापतिपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु आता बोडके यांच्या नियुक्तीने गिते यांच्यासमोर स्पर्धक निर्माण झाला आहे. बोडके गेल्या वर्षी स्थायी सभापतिपदासाठी इच्छुक होते.

पालकमंत्री महाजन यांचे गितेसमर्थक, तर आमदार सानप यांचे बोडकेसमर्थक असल्याने पालकमंत्र्यांनी सानप यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यास उद्धव निमसे ऐनवेळी सभापतिपदाचे दावेदार होऊ शकतात. त्यामुळे भाजपमध्येच सभापतिपदासाठी संघर्ष टोकाला पोचला आहे. दुसरीकडे सर्वच पदे पंचवटी विभागाकडे जात असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. विषय समित्यांवर २० पैकी पूर्व मतदारसंघातील नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. महापौर पदासारखे महत्त्वाचे पद पंचवटीकडे आहे. त्यामुळे स्थायी समितीचे पद अन्य विभागाकडे जाणे अपेक्षित असताना पंचवटीतच आग्रह धरला जात असल्याने नगरसेवकांमध्येही नाराजी पसरली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंचवटीऐवजी अन्य विभागाकडे सभापतिपद देण्याची शक्‍यता आहे.

गजानन शेलार, बग्गांचा पाणीकपातीवरून सभात्याग
गंगापूर व दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने दोन्ही धरणांत साठा वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी केलेली पाणीकपात मागे घेण्याची मागणी महापौर रंजना भानसी यांनी फेटाळल्याने शेलार यांच्यासह गुरुमित बग्गा यांनी सभात्याग केला. नाशिककरांना तहानलेले ठेवून मराठवाड्यासाठी पाणी साचविण्याचा प्रकार असल्याचा आरोप श्री. शेलार यांनी केला.

दोन आठवड्यांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पाण्याची स्थिती दयनीय असल्याने भविष्यात पाणी पुरविण्यासाठी महापौर भानसी यांनी ३० जूनपासून दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. या माध्यमातून दररोज ६० दशलक्ष लिटर, तर गुरुवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने ४६० दशलक्ष लिटर पाणी वाचत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, पाणीकपातीच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असतानाच शनिवार ते सोमवार असे तीन दिवस धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा ४०, तर दारणा धरणाचा साठा ४५ टक्के झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून पाणीकपात मागे घेण्याची मागणी सातत्याने होत आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी किमान गुरुवारी एक दिवसाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. परंतु प्रशासनासह महापौर पाणीकपातीच्या निर्णयावर ठाम असून, धरणांत समाधानकारक पाणी साचल्यानंतरच पाणीकपात मागे घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे, महासभेचे निमित्त साधून राष्ट्रवादीचे गटनेते शेलार यांनी एकवेळ पाणीकपात तशीच ठेवून दर गुरुवारी पाणीपुरवठा न करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Municipal Meeting Corporator