तपोवन परिसरातील ४०८ वृक्षांवर कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

माहिती अधिकारात बाब उघड; चार महिने उलटूनही आरोपीवर कारवाई नाही

जुने नाशिक - वन महोत्सवानिमित्त राज्य शासनाने एकीकडे चार कोटी वृक्षारोपणाचा दावा केला असून, पुढील वर्षी १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुसरीकडे, सरकारी यंत्रणेच्या आश्रयाने तपोवन परिसरातील चारशे सागवान आणि आंब्याची आठ झाडे अशी तब्बल ४०८ झाडांची बेकायदा कत्तल केल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. आरोपीवर गुन्ह्याची नोंद असली, तरी चार महिने उलटूनही पुढील कारवाई झालेली नाही. 

मुस्तफा गुलाम हुसैन ढोलकवाला यांनी मारुती वेफर्स परिसरातील (सर्व्हे नंबर ४००/अ/५/७ भूखंडावर) असलेल्या सुमारे चारशे सागवान व  आंब्याची आठ, अशा ४०८ झाडांची बेकायदा तोड केली. याबाबत राजेश बोरा यांनी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांनी ६ जुलैला माहिती अधिकाराखाली महापालिका उद्यान विभागाकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार मिळालेल्या माहितीत ही झाडे बेकायदेशीररीत्या तोड केल्याचे नमूद आहे. महापालिका उद्यान निरीक्षक बबन कटारे यांच्यासह सहकारी प्रभाकर बेंडकुळे व राजेंद्र देसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यात संबंधित जागेवरील झाडांची तोड केल्याचे निदर्शनास आले. तोडलेला लाकूडफाटा जागेवर आढळला नाही.

लाकूडफाट्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय व्यक्त करत श्री. कटारे यांनी १७ मार्चला भद्रकाली पोलिसांत ढोलकवालांविरुद्ध तक्रार दाखल करत गुन्हा नोंदविला. या घटनेला चार महिने उलटले, तरी अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले. विविध विभागांना कारवाईबाबतची मागणी करणारे अर्ज केले. त्यांनीही ढोलकवालांविरुद्ध कारवाई केली नाही. यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी 
श्री. बोरा यांनी केली.

या विभागांना केले अर्ज
पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, वन विभाग, वृक्ष प्राधिकरण समिती, भद्रकाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नावे राजेश बोरा यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी करणारे अर्ज केले. गुन्हा दाखल करण्यापलीकडे अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही. शिवाय तोडलेल्या लाकूडफाट्याचे काय झाले, याची माहिती मिळाली नाही.

ढोलकवाला यांनी इतक्‍या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर झाडांची कत्तल केली. त्यातून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे. असे असताना, त्यांच्या अद्याप कारवाई का नाही? झाडांची बेकायदेशीर तोड करणाऱ्यांची यामुळे हिंमत वाढणार आहे. त्यांच्यावर कारवाई करत इतरांसमोर आदर्श ठेवावा.
- राजेश बोरा, अर्जदार

Web Title: nashik news 408 tree cutting in tapovan area