इन्क्‍युबेटरमधील "गर्दी'चे 55 बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नाशिक जिल्हा रुग्णालयातील ऑगस्टमधील प्रकार; पाच महिन्यांत 187 बळी

नाशिक जिल्हा रुग्णालयातील ऑगस्टमधील प्रकार; पाच महिन्यांत 187 बळी
नाशिक - उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फरुकाबाद रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणाने देश हादरलेला असताना राज्यातील नाशिक रुग्णालयातही रुग्णालय व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगणारी बाब उघडकीस आली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातील इन्क्‍युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने ऑगस्टमध्ये 346 अर्भकांपैकी 55 बालके दगावल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.

नाशिकच्या रुग्णालयात एकेका इन्क्‍युबेटरमध्ये तीन, चार अर्भकांची कोंबाकोंबी होत असल्याची बाब "सकाळ'च्या नाशिक आवृत्तीने मंगळवारच्या अंकात समोर आणली होती. या रुग्णालयात केवळ अठरा इन्क्‍युबेटर्स आहेत. प्रत्यक्षात 53 बालके तिथे उपचार घेत आहेत. अशा रीतीने नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागावर (सीएनसीयू) अधिक ताण पडत असल्याने अर्भक मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. अपुऱ्या दिवसांत जन्मलेली व अन्य अशी 346 बालके गेल्या ऑगस्ट महिन्यात या कक्षात भरती करण्यात आली आणि त्यापैकी 55 अर्भकांचा मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एप्रिलपासून या कक्षात दगावलेल्या बालकांची संख्या तब्बल 187 असून, अन्य चार महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमधील अर्भकमृत्यूंचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. एक महिन्याच्या आतील नवजात अर्भकांचा मृत्यूदर दर एक हजार जिवंत जन्माच्या प्रमाणात मोजला जातो. देशात हे प्रमाण चाळीसपेक्षा कमी असताना नाशिक रुग्णालयात हे प्रमाण दीडशेहून अधिक असावे, ही बाब धक्‍कादायक मानली जात आहे.

याबाबत आरोग्य यंत्रणेतील उच्चपदस्थ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता उपचाराची पुरेशी सोय नसल्याने तो ताण जिल्हा रुग्णालयावर पडत आहे. येथील इन्क्‍युबेटरची संख्या वाढविण्यासाठी व त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी 21 कोटींचा निधी प्राप्त झाला, मात्र कक्ष उभारावयाच्या जागेवर झाडांचा अडथळा आहे. ती झाडे तोडण्याचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे.
वाढीव इन्क्‍युबेटर्स, कक्षाचा निधी वापराविना पडून
राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये कृत्रिम श्‍वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटरची सोय कुठेही नाही. इन्क्‍युबेटर्स उपलब्ध आहेत; पण त्यांची संख्या अपुरी आहे. जिल्हा रुग्णालयांमधील खाटांच्या संख्येनुसार ही संख्या ठरवली जाते. नाशिकमधील 18 इन्क्‍युबेटरची संख्या वाढविण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने गेल्या वर्षीच केली.

त्यानुसार वाढीव 20 इन्क्‍युबेटरना मंजुरी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत माता-बाल संगोपन केंद्राकडून नवीन कक्ष उभारणीसाठी 21 कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. आवारातील जागा निश्‍चित झाली. निविदाही निघाली; परंतु त्या जागेवरील 15 झाडांचा अडथळा आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला बंदी घातलेली असल्याने वर्षभरापासून निधी वापराविना पडून आहे. त्यासाठी मागितलेल्या परवानगीचा अर्जही डिसेंबरपासून महापालिकेकडे पडून आहे.

नाशिक रुग्णालयात पाच महिन्यांत दगावलेली नवजात बालके
महिना दगावलेली बालके (कंसात उपचारासाठी दाखल संख्या)

ऑगस्ट 55 (346)
जुलै 36 (314)
जून 25 (262)
मे 39 (303)
एप्रिल 32 (273)

Web Title: nashik news 55 death by incubator