"आयमा इंडेक्‍स' प्रदर्शनात ई- टॉयलेट, ई-रिक्षाची भुरळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नाशिक - टाचणीपासून ते विमानापर्यंत उत्पादनात भरारी घेणाऱ्या नाशिकच्या औद्योगिक नगरीने आता ई- टॉयलेटपासून ई- रिक्षापर्यंतची अत्याधुनिक उत्पादने बाजारात आणली आहेत. एकाच छताखाली ती पाहण्याची संधी "आयमा इंडेक्‍स' प्रदर्शनाद्वारे उपलब्ध झाली. जिल्ह्यातील औद्योगिक नगरीचे प्रतिबिंबच प्रदर्शनात उमटले आहे. 

नाशिक - टाचणीपासून ते विमानापर्यंत उत्पादनात भरारी घेणाऱ्या नाशिकच्या औद्योगिक नगरीने आता ई- टॉयलेटपासून ई- रिक्षापर्यंतची अत्याधुनिक उत्पादने बाजारात आणली आहेत. एकाच छताखाली ती पाहण्याची संधी "आयमा इंडेक्‍स' प्रदर्शनाद्वारे उपलब्ध झाली. जिल्ह्यातील औद्योगिक नगरीचे प्रतिबिंबच प्रदर्शनात उमटले आहे. 

अंबड इंडस्ट्रीज ऍन्ड मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनच्या आयमा इंडेक्‍स प्रदर्शनास गुरुवार (ता. 18)पासून सुरवात झाली. प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस होता. सकाळपासूनच नागरिकांचा प्रदर्शन पाहण्यासाठी उत्साह दिसला. दिवसभर विविध स्टॉलला भेटी देऊन रोज नवनवीन उत्पादनांची भर घालणाऱ्या कंपन्यांची माहिती त्यांनी घेतली. यंदा ई-टॉयलेट विशेष आकर्षण आहे. एस. एस. एंटरप्रायझेसने भारतीय बनावटीचे हे ई-टॉयलेट प्रथम बाजारात आणले आहे. सध्या परदेशातून आणलेले ई-टॉयलेट गोवा व ठाण्यात आहे. मात्र, त्याची किंमत पाच लाखांवर आहे. मेड इन नाशिकने ई- टॉयलेट अडीच लाखांत उपलब्ध करून दिले आहे. साडेतीनशे किलो वजन वाहू शकणाऱ्या ई-रिक्षाही सर्वांचे लक्ष वेधत आहे. या रिक्षा आतापर्यंत नाशिकमध्ये एक, तर मालेगावात सात वितरित झाल्या आहेत. दीड लाखापर्यंतची ही रिक्षा प्रवासी व माल वाहतुकीसाठी उपयोगी आहे. चार तास चार्जिंग केल्यानंतर साधारण शंभर किलोमीटर धावणाऱ्या या रिक्षाची माहिती यातून मिळते. उद्योजक यू. के. शर्मा, वंजारी, सौमित्र कुलकर्णी, उमेश जाधव यांचा श्री. सावरा यांच्या हस्ते सत्कार झाला. दिवसभर झालेल्या चर्चासत्रात पुण्याच्या फोरबॅकोसिस्टीमचे श्री. छात्रे, रॅपिड ट्रान्झीट कंपनीचे अजित ठाकूर, भगवंत बायो प्रोसेसरचे श्री. वंजारी, निफा कंपनीचे अशोक सुरवाडे यांनी, तर श्री. कृष्णा, खरजुले, मयूर तांबे यांनी स्टार्टअपवर मार्गदर्शन केले. धनंजय दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. 

उद्योजकांकडून थेट वस्तू खरेदीसाठी प्रयत्न - सावरा 
आदिवासी विकास विभागासाठी लागणाऱ्या वस्तू थेट उद्योजकांकडून खरेदी करण्याचा प्रयत्न विभाग निश्‍चित करेल, असे आश्‍वासन आज आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले. सायंकाळी श्री. सावरा यांनी प्रदर्शनास भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. "आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी त्यांचा सत्कार केला. माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आदिवासी खात्याला लागणाऱ्या वस्तू उद्योजकांकडून खरेदी केल्यास शंभर टक्के गुणवत्तापूर्ण व रास्त दरात देण्याचा प्रयत्न उद्योजक निश्‍चित करतील, असे स्पष्ट केले. त्यावर श्री. सावरा यांनी सूचनेचे स्वागत करून याचा विचार केला जाईल, असे सांगितले. ग्रामीण आदिवासी भागाच्या विकासासाठी या भागात येणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 65 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे तसेच आदिवासी भागातील तरुणांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले पाहिजे. त्यासाठी आदिवासी तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केल्यास उद्योजकांना आवश्‍यक सहकार्य करू, असेही सावरा यांनी सांगितले. 

Web Title: nashik news AIMA Index exhibition