कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे हृदयविकाराने निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

नाशिक - येथील प्रसिद्ध कलादिग्दर्शक अरुण विठ्ठल रहाणे (वय 57) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. गेल्या तीस वर्षांपासून ते नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.

नाशिक - येथील प्रसिद्ध कलादिग्दर्शक अरुण विठ्ठल रहाणे (वय 57) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. गेल्या तीस वर्षांपासून ते नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.

आज सकाळी आठला त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कॉलेज रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच नऊच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय नाशिकमध्ये स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कलाकारांना, तंत्रज्ञांना वाव मिळावा म्हणून नाशिकमध्ये चित्रनगरी होण्यासाठी त्यांनी अखेरपपर्यंत पाठपुरावा केला. त्यांनी तीन हिंदी चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपट व नाटकांचे कलादिग्दर्शन केले आहे. "तोचि एक समर्थ', "वंशवेल', "सावरखेड एक गाव', "जत्रा' यांसारख्या अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्रिमूर्ती चौक, सिडको येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी, शहरातील कलावंतांनी धाव घेतली.

निवासस्थानापासून दुपारी अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा कालिदास कलामंदिर येथे आली असता, नाट्य परिषदेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कलावंतांनी श्रद्धांजली वाहिली. दुपारी साडेचारला पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट महामंडळातर्फे रवी बारटक्के व शहरातील विविध संस्था, कलावंतांतर्फे जयप्रकाश जातेगावकर यांनी श्रद्धांजली वाहिली. नाट्य व चित्रपट क्षेत्रात काम करणारे विविध कलाकार, तंत्रज्ञ, तसेच चाहत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा प्रसाद कला क्षेत्रात कार्यरत असून, दुसरा मुलगा पुण्यात आयटी कंपनीत आहे.

रविवारी शोकसभा
दरम्यान, अरुण रहाणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी (ता. 26) सायंकाळी सहाला सार्वजनिक वाचनालयाच्या वा. गो. कुलकर्णी कलादालनात शोकसभा होणार आहे.

Web Title: nashik news arun rahane death