'अनुसूचित जमाती' समितीकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

आश्रमशाळांच्या तपासणीत आढळल्या असंख्य त्रुटी

आश्रमशाळांच्या तपासणीत आढळल्या असंख्य त्रुटी
नाशिक - तीन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. 1) रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सुविधा पोचविण्यात कमी पडल्याबाबत जाबही विचारला. समितीने केलेल्या आश्रमशाळांच्या तपासणीत असंख्य त्रुटी आढळल्याने आश्रमशाळांचे पितळ उघडे पडले. यामुळे संतप्त सदस्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले.

गुरुवार (ता. 29)पासून जिल्हा दौऱ्यावर असलेल्या या समितीच्या सदस्यांनी पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यांतील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते आदींची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. या पाहणीत सदस्यांना अनेक त्रुटी आढळल्या; तर ग्रामस्थांनी साधलेल्या संवादात तक्रारींचा पाऊस पाडला. तसेच योजना तळागाळापर्यंत पोचत नसल्याचे निदर्शनास आले.

गुणवत्तापूर्ण शिक्षण दूरच
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी या विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, आश्रमशाळा तपासणीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे सदस्यांना आढळून आले. यामुळे आश्रमशाळेतील शिक्षणाचेही पितळ उघडे झाले. विद्यार्थ्यांना पाढे विचारण्यात आले असता सांगता आले नाहीत. शिक्षकांनाही पाढे सांगता आले नाहीत.

तोरंगण येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अंडी, मांसाहारी खाद्य दिले जाते. याचा तपास केला असता नोंदवहीत 119 अंडी असल्याची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात एकही अंडे आश्रमशाळेत नसल्याचे सर्वत्र अनागोंदी कारभार दिसून आला. आश्रमशाळांची दुरवस्था असल्याचे दिसून आल्याने याबाबत काय सुधारणा केली, याचेही योग्य उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यामुळे तत्काळ आश्रमशाळांची दुरुस्ती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश समितीने दिले.

Web Title: nashik news ashram shala check-up