बाजार समितीत  अघोषित संचारबंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पंचवटी - शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी बळीराजाने उदंड प्रतिसाद दिल्याने एरवी भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळपासून अघोषित संचारबंदीसारखे वातावरण होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीत ठाण मांडून किरकोळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केल्याने समितीत दिवसभर शुकशुकाटच राहिला.

पंचवटी - शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी बळीराजाने उदंड प्रतिसाद दिल्याने एरवी भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळपासून अघोषित संचारबंदीसारखे वातावरण होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीत ठाण मांडून किरकोळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केल्याने समितीत दिवसभर शुकशुकाटच राहिला.

शेतकरी संपाचा परिणाम पहिल्याच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून आला. दिवसभरातून तीन वेळेस लिलाव होणाऱ्या समितीच्या आवारात आज भाजीपाला घेऊन एकही वाहन आले नाही. यामुळे सायंकाळनंतर तर शुकशुकाट होता. केवळ व्यापाऱ्यांनी सायंकाळी चक्कर मारून घरी जाणे पसंत केले.

इतर व्यवसायांवरही ‘बंद’चा परिणाम
दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांच्यासह शेतीपयोगी अवजारे आदींची मोठ्या प्रमाणात दुकाने असून, तेथे रोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. परंतु, शेतकरी संपामुळे आज एकही शेतकरी बाजार समितीकडे न फिरकल्याने या विक्रेत्यांना दिवसभर बसून राहावे लागले.

किरकोळ विक्री बंद पाडली 
किरकोळ विक्रेत्यांनी आपल्याकडील शिल्लक भाजीपाला सकाळी विक्रीसाठी समितीच्या आवारात आणला; परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखत तासभर सुरू असलेली किरकोळ विक्रीही बंद पाडली. शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद लभडे, नितीन रोटेपाटील, योगेश कुसमोडे यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते समितीच्या आवारात ठाण मांडून बसले होते.

दर वीस टक्‍क्‍यांनी वाढवून व्यापाऱ्यांकडून नफेखोरी 
पंचवटी ः शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणतेही व्यवहार झाले नाहीत. मात्र, गंगाघाटावरील किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाजीविक्री करताना १५ ते २० टक्के भाववाढ करीत नफेखोरीची संधी साधल्याने ग्राहकांना झळ सोसावी लागली. काल (ता. ३१)च्या आठवडे बाजारानंतर आज गंगाघाटावरील पारंपरिक भाजीबाजार भरणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आपल्याकडे शिल्लक असलेला भाजीपाला घेऊन या विक्रेत्यांनी आज गंगाघाटावर उर्वरित भाजीपाल्याची विक्री सुरू केली. आवक रोडावल्याने अनेक भाज्यांच्या दरांत मोठी भाववाढ केली. आज कैऱ्या विक्रेत्यांची संख्या अधिक होती. कालच्या बुधवारच्या आठवडे बाजारात महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी केली. त्या पार्श्‍वभूमीवर आज भाजीपाल्याची विशेष मागणी नव्हती, तरीही भाव चढेच राहिले.

Web Title: nashik news bazar samiti