'डीएपी'च्या नावाखाली विकले बनावट रासायनिक खत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

बोगस खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल ; नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई

बोगस खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल ; नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई
नाशिक - त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील सावरपाडा येथील भात उत्पादक शेतकऱ्यांना "सम्राट डीएपी 18:46' या खताच्या नावाखाली "सम्राट कॅल्शियम+सिलिकॉन' हे बनावट खत विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खताची अशी विक्री करणाऱ्या दत्तात्रय गाडेकर व अशोक सदगीर या दोन विक्रेत्यांविरुद्ध त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील विटनोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सावरपाडा येथे कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "उन्नत शेती व समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या वेळी येथील शेतकऱ्यांनी गावामध्ये आलेल्या फिरत्या विक्रेत्यांकडून "सम्राट डीएपी' खत खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार त्र्यंबकेश्‍वरचे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांना याबाबत संशय आला. त्यांनी या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास कळविले. विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलास मोते, नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप यांनी याबाबत तत्काळ चौकशी करण्याचे आदेश कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना दिले. त्यानुसार जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी या प्रकाराची चौकशी केली. विक्री झालेले खत सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीज, भेंडाळी, ता. निफाड येथे उत्पादित केलेले आढळले. अधिकाऱ्यांनी तत्काळ सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीजच्या फॅक्‍टरीची पाहणी केली. तिथे नॅचरल पोटॅश, सम्राट कॅल्शियम+ सिलिकॉन या खतांच्या बॅंगांचा अंदाजे 4 लाख किमतीचा साठा आढळून आला. या उत्पादनांसाठी तातडीचे विक्री बंदचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, जिल्हास्तरीय भरारी पथक व तालुकास्तरीय भरारी पथकाने सावरपाडा येथे भेट देऊन विक्री झालेल्या "सम्राट कॅल्शियम+सिलिकॉन'च्या खताचा नमुना प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतला. या वेळी पंचनामा नोंदविण्यात आला. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक तसेच खत नसलेले उत्पादन हे रासायनिक खत आहे, असे सांगून जास्त दराने विक्री केली म्हणून खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्‍यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन केल्यामुळे सिन्नर येथील खत विक्रेते दत्तात्रय गाडेकर माळी, अशोक सदगीर यांच्यासह सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्याविरुद्ध हरसूल पोलिसांत गुन्हा दाखल केला. भरारी पथकातील सदस्य व जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अण्णासाहेब साठे, त्र्यंबकेश्‍वरचे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे, त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील विटनोर यांनी ही कारवाई केली.

Web Title: nashik news bogus chemical fertilizer sailing dp name