बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट गडद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये पार्किंगचे क्‍लिष्ट नियम असल्याने व्यावसायिकांना प्रकल्पांमधून नफा मिळणार नाही. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू झाले नाही. त्याचा परिणाम विजयादशमीला दिसून आला.
- जयेश ठक्कर, माजी अध्यक्ष, क्रेडाई.

- दसऱ्याला केवळ शंभर सदनिकांची विक्री,
- नव्या नियमावलीमुळे नवे प्रकल्प नाही, जुनेच उपलब्ध

नाशिक: बांधकाम व्यावसायिकांसाठी दसरा तसा व्यवसायाची पर्वणी असते. परंतु यंदाचा दसरा मंदीत गेल्याने रिअल इस्टेट व्यवसायावरचे मंदीचे सावट अधिक गडद झाले आहे. दरवर्षी हजारो सदनिका विकल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये यंदा शंभर सदनिका विकण्याची वेळ आली आहे. नवीन प्रकल्पांना सुरवात न झाल्याने जुने व पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील सदनिका विकल्या गेल्या. यानिमित्ताने शहरात मागणी वाढल्याचेदेखील स्पष्ट झाले. नव्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा झाल्यास बांधकाम प्रकल्पांना गती येणार आहे.

बांधकाम व्यावासयिकांसाठी यंदाचा दसरा मंदीत गेला आहे. त्याला कारण नवीन विकास नियंत्रण नियमावलीतील नियमांचा अडसर ठरला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने बांधकामांवर बंदी लादली होती. त्यानंतर शासनाचे टीडीआरचे धोरण बदलले होते. नाशिकमध्ये कपाटांचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आजही सहा हजारांहून अधिक पूर्ण झालेल्या इमारती पूर्णत्वाच्या दाखल्याची वाट पाहत आहे. त्यात राज्य शासनाने नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये पार्किंगचा क्‍लिष्ट नियम टाकल्याने नवीन प्रकल्पांना ब्रेक लागला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात 213 नवीन प्रकल्पांचे प्रकरण दाखल झाले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्प बंगल्यांचे आहेत. मोठे प्रकल्पांचे प्रकरणे अद्यापही दाखल झालेले नाहीत. आधी पार्किंग दाखला नंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे धोरण आहे. पुणे व नागपूरपेक्षा पार्किंगबाबत नाशिकला वेगळा न्याय दिला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना प्रॉफिट मार्जिन मिळत नसल्याने नवीन प्रकल्पांची प्रकरणे दाखल होणे बंद झाले आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या दसऱ्याला दिसून आला. दसऱ्याला दरवर्षी हजारो फ्लॅट विकले जातात, यंदा नवीन प्रकल्प सुरू नसल्याने ग्राहक शिल्लक फ्लॅटकडे वळले आहेत. परंतु त्या फ्लॅटची संख्याही मर्यादित असल्याचे दिसून आले. दिवसभरात सरासरी शंभर फ्लॅटचा ताबा दिल्याचे सांगण्यात आले.

मागणी वाढली, उपलब्धता कमी
अडीच वर्षांपासून शहरात बांधकाम व्यवसायावर आर्थिक संकट आले आहे. या काळात नवीन प्रकल्प तयार झाले नाही, तयार झालेले फ्लॅटची विक्री अद्यापही सुरू आहे. नवीन फ्लॅट तयार होत नसल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत फ्लॅट कमी उपलब्ध आहे.

Web Title: nashik news building business Slowdown