नाशिक - नाशिक कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधलेल्या जेल रोड येथील "कॅथेड्रल'चे उद्या (ता. 19) सकाळी अकरा वाजता कार्डिनल ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कॅथेड्रलमधील प्रतिष्ठापना व उद्घाटनासाठी विविध भागातील ख्रिस्ती धर्मगुरू उपस्थित राहत आहेत. येथील या चर्चच्या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्सुकता आहे.
जेल रोडला पूर्वीच्या सेंट ऍनर्सच्या चर्चलगत उभारलेल्या नव्या कॅथेड्रलच्या कामाची अंतिम तयारी पूर्णत्वास आली आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कॅथेड्रलला रोषणाई करण्यात आली आहे. नवीन कॅथेड्रलच्या इमारतीचे बांधकाम 35 हजार चौरस फुटांचे आहे. चर्चच्या दर्शनी भागावर येशू ख्रिस्ताचा भव्य पुतळा उभारला आहे.
कॅथेड्रलमध्ये उद्या सकाळी साडेदहापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होईल. साधारण पावणेअकराला कार्डिनल ग्रेशियस व नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप लूडस डॅनियल हे कॅथेड्रलच्या महाद्वारावर दाखल होतील. त्यानंतर वास्तुविशारद जॉन वर्गीस कॅथड्रलच्या चाव्या त्यांच्याकडे सुपूर्द करतील. त्यानंतर फीत कापून कॅंथेड्रल इमारतीचे उद्घाटन होईल.
|