'चांक शिक्षणाची' संस्थेमार्फत बालविवाह रोखण्यात यश...

प्रशांत कोतकर
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

सुनीताचा बालविवाह रोखल्यामुळे ती पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. आमच्या शाळाबाह्य सर्वेक्षणात शाळाबाह्य़ मुलींचे प्रमाण मोठे आहे व मुली शाळाबाह्य होण्याचे प्रमुख कारण बालविवाह हा आहे. आजही भारतात तेरा दशलक्षहून अधिक मुलींचे बालविवाह होतात तिच्यातला आज एक मुलगी वाचवण्यात यश आले.
- सचिन उषा विलास जोशी, संचालक, चांक शिक्षणाची

नाशिक : सुनिता (नाव बदलले) इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेणारी, राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक मधील विद्यार्थिनीचा विवाह आज म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मोतीनगर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर येथे मुकेश नारायण शिंगडे, (रिक्षा चालवतो) याच्यासोबत ठरवला होता.

चाकं शिक्षणाची या संस्थेच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दोन वर्षांपूर्वी सुनीता ही शाळाबाह्य़ असल्याचे आढळून आली. चर्चा केली असता सौंदाने, मालेगाव येथील आश्रमशाळेत भीषण पाणी टंचाईमुळे शाळा मध्येच सोडून नाशिकला आली. तिला पुन्हा शाळेत जाण्यास आम्ही प्रोत्साहन देऊन पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे तिला शिक्षणाची गोडी निर्माण झाली. परंतु, आई वडील दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात व मुलीकडे लक्ष देण्यास कोणी नसल्याने सुनीताचा विवाह करत आहोत, असे तीची आई म्हणाली.

सुनीताचा या विवाहास मान्यता नव्हती म्हणून ती संस्थेच्या फिरत्या शाळेत येऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत भामरे यांना भेटून विवाह थांबवण्याची विनंती केली. हेमंत भामरे यांनी शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांना भेटून दोघांनी पुढील विवाह थांबण्यासाठी ची आखणी केली.

सदर बालविवाह रोखण्याबाबत आमच्याकडून नाशिक येथील महानिरिक्षक (I G, Nashik Division) यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्वरीत पोलिस उप अधीक्षक अरुंधती राणे यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षक ऑफिसला फॅक्स केला. अहमदनगर पोलिस अधिक्षक कार्यालयाने वर पक्षाकडच्यांना नोटीस देऊन, तसेच प्रत्यक्ष बोलावून लग्न रोखत असल्याचे लेखी लिहुन घेतले. आज रोजी होणारा हा बालविवाह रोखण्यात आला.

Web Title: nashik news chak shikshanachi child marriage social