सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

सिडको - सिडको प्रशासनाचे येथील कार्यालय बंद करून औरंगाबाद येथून ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय सिडकोच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याने हे कार्यालय बंद करू नये, यासाठी आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हे कार्यालय स्थलांतरित होणार नाही व या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे,  असे सांगितले. 

सिडको - सिडको प्रशासनाचे येथील कार्यालय बंद करून औरंगाबाद येथून ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय सिडकोच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याने हे कार्यालय बंद करू नये, यासाठी आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हे कार्यालय स्थलांतरित होणार नाही व या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे,  असे सांगितले. 

आमदार सौ. हिरे यांनी तत्काळ भेट घेऊन याबाबत निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून सिडको व्यवस्थापनाने राज्यातील कार्यालये बंद करून औरंगाबाद येथून कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाकडून घरे घेतलेल्या रहिवाशांची मोठी गैरसोय होईल. कारण, बहुतांश घरे रहिवाशांच्या नावावर झालेली नाहीत. त्यामुळे अनेकांना अडचणी येणार आहेत. काल (ता. ११) नागरिक संघर्ष समितीने सिडकोच्या प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन देऊन हे कार्यालय बंद करू नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे आमदार हिरे यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली व या विषयावर सविस्तर चर्चा केली. येथील नागरिकांना ऑनलाइन व्यवहार कसे करायचे, याची माहिती नाही. कर्जासाठी बॅंकांना ना हरकत दाखला देताना भरावयाचे प्रशासकीय शुल्क कसे भरणार, याचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

सिडको कार्यालय येथे असतानाही अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचे काय होणार? लीज होल्ड टू फ्री होल्ड याबाबत काहीच प्रशासकीय तयारी नसताना हे कार्यालय बंद करणे सर्वच दृष्ट्या नुकसानीचे ठरणार आहे. अनेक मिळकतींचा भाडेपट्टा करारनामा बाकी आहे. काही मिळकतींची जनरल मुख्यातरपत्राच्या आधारे विक्री झाली असून, मिळकती त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. या व इतर गोष्टींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे कार्यालय बंद करू नये, या मागणीचे निवेदन आमदार हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. त्यावर हे कार्यालय बंद केले जाणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. श्री. फडणवीस यांनी सिडकोच्या व्यवस्थापन मंडळास कार्यालय बंद करू नये, असे आदेश दिले आहेत. सौ. हिरे यांनी सिडको व्यवस्थापकांनाही निवेदनाची प्रत पाठविली आहे.

Web Title: nashik news CIDCO administration Devendra Fadnavis