‘सिव्हिल’च्या नवीन इमारतीतील बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक - जिल्हा रुग्णालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उभारलेल्या नवीन इमारतीचा काल दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. इलेक्‍ट्रिशियनची शोधाशोध केल्यानंतर सायंकाळी नवीन इमारतीतील वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, दिवसभर इमारतीतील तिन्ही मजल्यांवरील रुग्णांची मोठी गैरसोय झाली. एवढेच नव्हे, तर याच इमारतीतील दूरध्वनीसेवाही नादुरुस्त झाल्याने इमारतीशी संपर्कही तुटला होता. 

जिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर २०० खाटांची नवीन इमारत उभारली आहे. प्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्यात या इमारतीचा उपयुक्त वापर झाला नाही. अखेरीस काही महिन्यांपासून या इमारतीचा वापर सुरू झाला आहे. महिलांचा विशेष वॉर्ड, ऑर्थोसह प्रसूती वॉर्डातील महिलांची इमारतीत व्यवस्था आहे. नवीन असलेल्या इमारतीत नेहमीच ड्रेनेज लाइन तुंबल्याने पाणी साचून ते वॉर्डाऋमध्ये पसरल्याचे अनेकदा घडले आहे. त्यामुळे इमारतीतील खराब प्लंबिंगचे काम उघडकीस आले होते. 

काल दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने विशेष वॉर्डातील महिला रुग्णांची सोनोग्राफी होऊ शकली नाही. ऑर्थो वॉर्डमधील रुग्णांचे ‘एक्‍स-रे’साठी ने-आण करता आली नाही. कारण इमारतीची रुग्णांसाठीची लिफ्टच बंद असल्याने रुग्णांना दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत नेणे जिकिरीचे होते. वीजपुरवठा नसल्याने रुग्णांना ऑक्‍टोबर हीटचाही त्रास झाला. दूरध्वनीसेवाही खंडित झाल्याने प्रकृती बिघडलेल्या रुग्णांची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला देता आली नाही.

रुग्णालय प्रशासनाकडून इलेक्‍ट्रिशियनची शोधाशोध केली गेली. मात्र, तो वेळेवर मिळाला नाही. अखेरीस सायंकाळी सहाच्या सुमारास या इमारतीतील खंडित वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, दिवसभर रुग्णांच्या झालेल्या गैरसोयीकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे रुग्णांनी सांगितले.

Web Title: nashik news civil hospital electricity