कोळसा टंचाईमुळे अंधाराचे सावट 

नीलेश छाजेड
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

एकलहरे (जि. नाशिक) - कोळसा टंचाईमुळे "महानिर्मिती' कंपनीवर वीज संचही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील साधारण 1330 मेगावॉटची वीजनिर्मिती घटली आहे. बहुतांशी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत पाच- सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने कोळसा टंचाईचा विषय मार्गी न लागल्यास, ऐन दीपोत्सवात राज्यावर अंधाराचे सावट घोंगावणार आहे. 

पितृपक्षात कुठलेही शुभकार्य वर्ज्य मानण्याची पारंपरिक रीत आहे. मात्र, लागलीच नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यानंतर दसरा व पाठोपाठ दिवाळी या काळात पुन्हा एकदा बाजारात तेजी व चैतन्य अवतरते. पण, सध्या पितृपक्षातच राज्यातील बहुतांशी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये जेमतेम पाच- सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. कोळसा टंचाईमुळे काही वीज केंद्रांतील संच बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दसरा- दिवाळीत कोळशाचे हे संकट आणखी बिकट होण्याची भीती आहे. 

वीज केंद्रांकडील सध्याचा शिल्लक कोळसा सुमार दर्जाचा आहे. कोळसा जितका खराब तेवढा वीजनिर्मितीसाठी इंधनतेलाचा वापर अनिवार्य ठरतो, त्यामुळे वीजनिर्मिती खर्चात वाढ होते. कोळसा तुटवड्यामुळे कोराडी (660 मेगावॉट), भुसावळ (210 मेगावॉट), खापरखेडा (210 मेगावॉट) आणि परळी (250 मेगावॉट) येथील प्रत्येकी एक संच, अशी एकूण 1330 मेगावॉट वीजनिर्मिती थांबवली होती. अजूनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने आज रात्री चंद्रपूर संच क्रमांक 3 (210 मेगावॉट), कोराडी येथील संच क्रमांक 7 (210 मेगावॉट), खापरखेडा येथील संच क्रमांक 2 (210 मेगावॉट) बंद करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वीज केंद्रांकडे शिल्लक कोळसा 
भुसावळ - 38,851 
चंद्रपूर - 2,45,605 
खापरखेडा - 68,724 
कोराडी - 89,500 
नाशिक - 37,700 
परळी - 23,000 
पारस - 23,500 
(आकडे टनांमध्ये) 

राज्याच्या अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे मागणी सध्या कमी आहे. कोळसा पुरवठ्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोळसा पुरवठ्यात आगामी काळात निश्‍चित सुधारणा होईल. 
- महेश आफळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, "महानिर्मिती'

Web Title: nashik news coal shortage