नाशिककरांना हुडहुडी

नाशिककरांना हुडहुडी

जुने नाशिक - अरबी समुद्रातील ओखी वादळाच्या प्रभावाने शहरात पहाटेपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण होऊन जनजीवन विस्कळित झाले. 

ओखी वादळ सुरतच्या दिशेने वळाले असले, तरी शहराच्या वातावरणावर त्याचा परिणाम झाला. पाऊस अन्‌ हवेतील गारव्यामुळे नागरिकांचा दिवस उजाडण्यास आज उशीर झाला. अनेकांनी व्यवसाय बंद ठेवत, तर काहींनी कामाला दांडी मारून घरी राहणे पसंत केले. काही व्यावसायिकांनी चक्क व्यवसायाच्या ठिकाणी भरदुपारी शेकोटी पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न केला.

शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य होते. दुपारी चारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागरिक दैनंदिन कामासाठी बाहेर पडले. बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावे, की रेनकोट परिधान करावा, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. अवकाळी पावसामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. तीन-चार दिवसांपासून सोशल मीडिया व माध्यमातून ओखी वादळासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. वातावरणातील बदलामुळे विद्यार्थ्यांची शाळांत ३० ते ४० टक्के उपस्थिती कमी होती. उपस्थित विद्यार्थ्यांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे परिधान केले होते. उद्या अशीच परिस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आणखी परिणाम होणार असल्याचेही शिक्षकांनी सांगितले.

वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित
सकाळपासून सुरू झालेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे नाशिक, नाशिक रोडसह अनेक फीडरांना फटका बसून वीजपुरवठा खंडित झाला. शहर विभाग २ मधील ११ केव्हीच्या पंचक उपकेंद्रावरील मोटवानी, सायट्रिक, दुर्गा मंदिर, सिन्नर फाटा येथे पुरवठा खंडित झाला. उपनगर केंद्रावरील समतानगर, इच्छामणी, मुक्तिधाम उपकेंद्रावरील आर्टिलरी, देवळालीगाव, लॅम रोड, टाकळी केंद्रावरील टाकळी, मुंबई रोड, शिवाजीवाडी केंद्रावरील भारतनगर, राजीवनगर, मखमलाबाद केंद्रावरील बोरगड, ढागूर, सारूळ केंद्रावरील सपट विल्होळी, राजूर, बेळगाव ढगावरील संदीप फाउंडेशन, देवळाली कॅम्प केंद्रावरील बाजार, लॅम रोड केंद्रावरील फीडरवर परिणाम होऊन वीजपुरवठा खंडित झाला. तसेच शहर विभाग १ मधील म्हसरूळ, क्रीडासंकुल, आरटीओ, अंबड, विद्याविकास, महिंद्र, सारडा सर्कल, अशोक स्तंभ, उदोजी मराठा या केंद्रांवरील बिघाड झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com