मनपाच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे नगरसेवक विकास निधीला कात्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

४० लाखच उपलब्ध; पायाभूत सुविधांवरच खर्च करा - आयुक्त
नाशिक - यंदाच्या पंचवार्षिकमधील पहिल्याच वर्षात पाऊण कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर झाल्याने विकासकामांचे नियोजन करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी झटका दिला आहे.

४० लाखच उपलब्ध; पायाभूत सुविधांवरच खर्च करा - आयुक्त
नाशिक - यंदाच्या पंचवार्षिकमधील पहिल्याच वर्षात पाऊण कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर झाल्याने विकासकामांचे नियोजन करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी झटका दिला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ७५ लाख रुपयांऐवजी फक्त चाळीस लाख रुपये विकासकामांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्थायी समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. विकासकामांचे प्रस्ताव देतानाही सभागृह, सभामंडप अशा वायफळ बाबींवर खर्चाचे प्रस्ताव न देता ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता व रस्ते या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरच खर्च करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

यंदाच्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रशासनाने स्थायी समितीसमोर एक हजार ४१० कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यात भांडवली कामांसाठी फक्त १३० कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याचे दर्शविण्यात आले. घरपट्टी, पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर त्याच वेळी नगरसेवकांच्या विकास निधीला कात्री लागणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले होते; परंतु स्थायी समितीसह महासभेने कोटींची उड्डाणे घेत अंदाजपत्रक दोन हजार २०० कोटी रुपयांपर्यंत पोचविले. प्रशासनाने उत्पन्नाचे स्रोत वाढविणे व शासनाकडून अनुदान स्वरूपात निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. स्थायी समितीने नगरसेवकांसाठी चाळीस लाख रुपये निधीची तरतूद केली होती. महापौर रंजना भानसी यांनी त्यात माझ्याकडून ३५ लाख रुपयांची भेट असल्याचे सांगत नगरसेवक निधी ७५ लाख रुपये केला होता. महापौरांकडून नगरविकास विभागाला नुकताच ठराव प्राप्त झाला.

त्यातसुद्धा ७५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. महापौरांच्या घोषणेनंतर नगरसेवकांनी कामांचे नियोजन केले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचे प्रस्ताव सुचवून प्रशासनाला घाम फोडला होता. महापौरांकडून प्रशासनाला ठराव प्राप्त झाला असतानाच आयुक्त कृष्णा यांनी प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट केली. त्यात महापौरांनी जाहीर केलेल्या ३५ लाख रुपयांच्या निधीला कात्री लावत स्थायी समितीच्या चाळीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याचे घोषित करत सत्ताधारी नगरसेवकांना झटका दिला. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सूर्यकांत लवटे, मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
 

महत्त्वाच्या कामांचा समावेश
महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यास वाढीव निधी देण्याबाबत विचार करता येईल. नगरसेवकांना चाळीस लाख रुपयांचा निधी देता येईल. त्यात एक काम सुचविले तरी चालेल; परंतु नगरसेवकांनी शौचालये, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छतेबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

Web Title: nashik news corporator development fund decrease