कुतूहलापोटी रिव्हॉल्व्हर बघताना अचानक गोळी सुटल्याने एक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नांदगाव - ढेकू (ता. नांदगाव) येथे एका लष्करी जवानाच्या घरी पाहुणा आलेल्या एकाचा, कुतूहलापोटी रिव्हॉल्व्हर बघत असताना अचानक गोळी सुटल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नांदगाव - ढेकू (ता. नांदगाव) येथे एका लष्करी जवानाच्या घरी पाहुणा आलेल्या एकाचा, कुतूहलापोटी रिव्हॉल्व्हर बघत असताना अचानक गोळी सुटल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगणे (ता. वैजापूर, औरंगाबाद) येथील बाजीराव म्हस्के व त्यांची पत्नी यमुनाबाई शनिवारी (ता. २६) ऋषिपंचमीच्या पूजेसाठी ढेकू येथे कपालनाथ आश्रमात आले होते. बाजीराव यांचे आतेभाऊ काकासाहेब साधबळे सध्या ढेकू येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे सहानगाव (ता. वैजापूर) येथील रहिवासी असून, लष्करात जम्मू येथे सेवेत आहेत. त्यांनी ढेकू येथे शेती विकत घेतल्याने पत्नी व मुलगा राहुल शेतातच वस्ती करून राहतात. त्यामुळे म्हस्के दांपत्य जेवणासाठी त्यांच्याकडे गेले होते. आज दुपारी दीडच्या सुमारास काकासाहेब यांचा मुलगा राहुल हा श्री. म्हस्के यांना आपल्या वडिलांकडे असलेले रिव्हॉल्व्हर दाखवत होता. कुतूहलापोटी रिव्हॉल्व्हर बघत असताना अचानक खटका दाबला गेला व बाजीराव म्हस्के गंभीर जखमी झाले. त्या वेळी यमुनाबाईने तातडीने हिंगणा येथे पुतण्या नवनाथ शिवाजी म्हस्के याला दूरध्वनीवरून ही माहिती कळविली. त्यानंतर बाजीराव यांना जखमी अवस्थेत मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी रात्री शस्त्रक्रिया करून बाजीराव यांच्या छातीत खालच्या बाजूला घुसलेली गोळी काढली. अत्यंत जवळून सुटलेली ही गोळी बाजीराव यांच्या छाती व पोटाच्या मध्यभागाचा वेध घेत त्यांच्या पाठीतून उजवीकडे आरपार निघाली. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी पावणेदोनच्या सुमारास बाजीराव यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, ढेकू येथील घरात न वापरलेले काडतूस मात्र सापडलेले आहे. तसेच यमुनाबाई या मानसिक धक्‍क्‍यातून सावरलेली नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार तो झोपलेला होता. गोळीबाराच्या आवाजाने त्याला जाग आली, तेव्हा हा प्रकार दिसला. या प्रकरणी बाजीराव म्हस्के यांचा पुतण्या नवनाथ म्हस्के याने दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा राहुल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बशीर शेख, उपनिरीक्षक बालाजी पद्मने, रमेश पवार आदी तपास करत आहेत. दरम्यान, मालेगावच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी हिंगणे येथे रवाना करण्यात आला.

राहुलला अटक
दरम्यान, नवनाथ म्हस्के यांच्या तक्रारीवरून राहुल साधबळेविरुद्ध मनुष्यवधाला कारणीभूत ठरल्याचा व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला  पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. तसेच परवानाधारक  रिव्हॉल्व्हर घरी बाळगताना काळजी घेतली नाही म्हणून राहुलचे वडील लष्करी जवान काकासाहेब साधबळे यांची चौकशी सुरू आहे. 

Web Title: nashik news crime