भररस्त्यात लूटमार करणारे सहा चोरटे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - गंगापूर नाक्‍याकडून व्ही. एन. नाईक महाविद्यालयाकडे मोबाईलवर बोलत पादचारी युवकाला तीन दुचाकींवरून आलेल्या सहा चोरट्यांनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावला. त्यानंतर केटीएचएम महाविद्यालयासमोर एकाच्या गळ्यातील चांदीची साखळी लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून पेठ रोड परिसरातून सहा संशयितांना शिताफीने अटक केली. न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  

काल (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास चेतन बोरसे (वय २४, रा. हिरावाडी रोड, कमलनगर, पंचवटी) गंगापूर नाक्‍याकडून व्ही. एन. नाईक महाविद्यालयाकडे पायी जात होता. त्या वेळी तो मोबाईलवर बोलत असतानाच पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या ॲक्‍टिवावरून दोन संशयित आले आणि त्यांनी बोरसे याला दुचाकी आडवी लावून अडविले. त्यानंतर लगेच शाइनवरून दोन संशयित आले. दोघांनी बोरसेला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, बोरसेने प्रतिकार केला. त्याच वेळी आणखी एका दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बोरसेकडील मोबाईल बळजबरीने हिसकावला आणि तीन गाड्यांवरून सहाही संशयित पसार झाले. त्यानंतर सातच्या सुमारास याच संशयितांपैकी ॲक्‍टिवावरील दोघांनी केटीएचएम महाविद्यालयासमोर ४५ वर्षीय संजय लटके (रा. कालिकानगर, दिंडोरी रोड) यांना अडविले. त्यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅमची चांदीची साखळी बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी बोरसेने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. 

तक्रारदार बोरसेने ॲक्‍टिवाचा क्रमांक (एमएच १५- एफए ४७०६) पोलिसांना दिला. पोलिसांनी या क्रमांकावरून दुचाकीमालकाचा शोध घेतला. संशयित सुयोग पवार (वय २२, रा. फ्लॅट नं. २, गोविंद अपार्टमेंट, शाहूनगर, पेठ रोड), दिनेश शर्मा (२१, रा. घर नं. १३४, अश्‍वमेधनगर, आरटीओ, पेठ रोड), विशाल जाधव (२१, रा. घर नं. १०३, नामको हॉस्पिटलजवळ, अश्‍वमेधनगर, आरटीओ, पेठ रोड), विकी पाटील (२६, रा. वेडीकर स्वीटजवळ, अश्‍वमेधनगर, आरटीओ, पेठ रोड), अतिश अहिरे (१९, रा. सप्तशृंगीमाता मंदिराजवळ, गजवक्रनगर, आरटीओ, पेठ रोड), रवींद्र पाटील (वय २३, रा. बाबाचा ढाबाजवळ, अश्‍वमेधनगर, आरटीओ, पेठ रोड) यांना सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही दुचाकी जप्त केली. सहाही चोरट्यांना न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: nashik news crime