अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक - थेट कोलकत्यापर्यंत पोचलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा शोध घेत अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरो) पथकाने नाशिकमधून 20 वर्षीय महाविद्यालयीन युवकाला अटक केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईतून पथकाने अभियंतानगर परिसरातील संशयित कमलेश बस्ते याच्या घरातूनही अमली पदार्थ जप्त केले असून, सध्या तो कोलकता न्यायालयाने दिलेल्या कोठडीत आहे. 

नाशिक - थेट कोलकत्यापर्यंत पोचलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा शोध घेत अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरो) पथकाने नाशिकमधून 20 वर्षीय महाविद्यालयीन युवकाला अटक केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईतून पथकाने अभियंतानगर परिसरातील संशयित कमलेश बस्ते याच्या घरातूनही अमली पदार्थ जप्त केले असून, सध्या तो कोलकता न्यायालयाने दिलेल्या कोठडीत आहे. 

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोलकता येथे आर्किटेक्‍ट इंजिनिअर असलेल्या रिद्‌म दास यास अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक केली असता त्याच्या चौकशीतून नाशिकमधून कुरिअरमार्फत त्याच्यापर्यंत अमली पदार्थ पोचत असल्याचे समोर आले होते. तेथील पथकाने तपासाची दिशा नाशिककडे वळविली असता, गेल्या आठवड्यात कामटवाडा परिसरातील गौरीनंदन ऑर्किड या इमारतीमध्ये सुरू असलेल्या कुरिअर एजन्सीच्या कार्यालयावर पाळत ठेवली आणि दोन दिवसांपूर्वी कमलेश बस्ते (वय 20, रा. अभियंतानगर, सिडको, नाशिक) याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता पथकाला 0.3 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. या प्रकरणी त्यास तातडीने कोलकत्याला नेण्यापूर्वी जिल्हा न्यायालयातून ट्रांझिट रिमांड मिळवून त्यास कोलकत्याच्या न्यायालयात हजर केले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, प्राथमिक पातळीवर या रॅकेटचे धागेदोरे दुबईपर्यंत असल्याचे समोर आले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा नाशिक पोलिसांना कसलाही थांगपत्ता लागला नसून अमली पदार्थविरोधी पथकानेही याचा सुगावा पोलिसांना लागू दिला नाही. त्यामुळे कमलेशसारखे नाशिकमध्ये अमली पदार्थांच्या विळख्यात व तस्करीमध्ये युवक अडकल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

संशयित कमलेश बस्ते हा परदेशी शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करीत होता; परंतु याचदरम्यान तो अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात आला आणि पैशांच्या लालसेपोटी तो यात ओढला गेल्याचे तपासातून समोर आले आहे. कमलेशने कुरिअर एजन्सीच्या माध्यमातून कोलकत्यासह देशभरात अनेक ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी केली असण्याची शक्‍यता असून, त्यासाठी कुरिअर एजन्सीकडील रेकॉर्डसही पथकाने ताब्यात घेतले आहे. दुबई-मुंबई-नाशिकमार्गे कोलकता असे रॅकेट अस्तित्वात असून, हे संपूर्ण रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यासाठी पथक दुबईपर्यंत पोचले आहे.

Web Title: nashik news crime college student arrested for drug trafficking