नाशिकसह सहा ठिकाणी डे केअर सेंटर - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सकारात्मकतेने ‘स्पेशल बेबी युनिट’ सुरू करण्यास पावले उचलली आहेत. इन्क्‍युबेटर उपलब्ध झाल्याने नवजात बालकांना अधिक चांगले उपचार मिळतील. युनिटसाठीची जागा निश्‍चित असून, समितीला ती दाखविली जाईल. लवकरच हे युनिट सुरू होईल व नवजात बालकांवर नाशिकमध्येच उपचार होतील.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक

नाशिक - अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांत ‘मेमरी क्‍लिनिक’ सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात अशा रुग्णांसाठी नाशिकप्रमाणेच पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे ‘डे केअर सेंटर’ सुरू होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मुंबईत दिली. 

आरोग्यमंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. डॉ. सावंत म्हणाले, की आयुर्मानात वाढ झाल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे येथील मनोरुग्णालयात दर आठवड्याला साधारणतः चौदाशे जणांची तपासणी केली जाते. त्यातील किमान सहा ते सात रुग्ण अल्झायमर व स्मृतिभ्रंशाचे असल्याचे आढळते. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. त्याकरिता आरोग्य विभागातर्फे अभियान स्वरूपात जाणीवजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येताहेत.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमधील ‘मेमरी क्‍लिनिक’च्या माध्यमातून अल्झायमरविषयी ‘अर्ली डिटेक्‍शन सेंटर’ सुरू करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयक अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येतील.
पहिल्या टप्प्यातील ‘डे केअर सेंटर’मध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या शुश्रूषेविषयी मार्गदर्शन होईल. या आजाराबाबत सामान्यांत जाणीवजागृती करणे आवश्‍यक आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. बैठकीला सहसंचालक डॉ. साधना तायडे, अल्झायमरविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या विद्या शेणॉय, ठाणे मनोरुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ उपस्थित होते.

दरम्यान, स्पेशल बेबी युनिट’ या संदर्भातील पाहणी करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाचा दौरा करणार आहे. मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलच्या स्पेशल बेबी युनिटचे प्रमुख व न्यूरोलॉजिस्ट यांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच जिल्हा रुग्णालयास भेट देईल. याच धर्तीवर दुसरे स्पेशल बेबी युनिट विदर्भातील अमरावती येथे सुरू केले जाणार आहे. 

इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे एकाच महिन्यात ५५ नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना सप्टेंबरमध्ये घडली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाले आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्या वेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी भेट देत आढावा घेतला. महिनाभरात जास्तीचे नऊ इन्क्‍युबेटर जिल्हा रुग्णालयास दिली. जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणा हे तालुके आदिवासीबहुल व तिथे बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने त्यासाठी श्रेणी द्वितीयच्या धर्तीवर शालिमार चौकातील संदर्भ सेवा रुग्णालयात ‘स्पेशल बेबी युनिट’ सुरू करण्यात येईल, असेही आश्‍वासन दिले.

Web Title: nashik news day care center in six place