गुणवत्ता हेच भांडवल - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

'शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञान अंगीकारले आहे त्यामुळे जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे, आपल्याला ज्ञानाधारित समाज रचनेकडे जावे लागणार आहे...

नाशिकरोड – "पैसा हे भांडवल नसून, गुणवत्ता हे भांडवल आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने गुणवत्तेशी तडजोड न करता शंभर वर्षाच्या कालावधीत विविध आव्हाने पेलत मार्गक्रमण करून शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवली आहे,'' असे गौरवोदगार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) काढले. "प्रगत शिक्षण अभियानात प्राथमिक विभागावार लक्ष केंद्रित केल्याने देशात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून प्राथमिक शिक्षणात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित  नूतन सभागृह पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल येथे संस्थेच्या शतक महोत्सव उदघाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नामदार गिरीश महाजन, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, शतक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, देणगीदार श्रीमती धामणकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शतक महोत्सव निमित्त आयोजित शतक महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन केले, यावेळी त्यांनी संस्थेची शंभर वर्षाचा इतिहास सादर केलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली. यानंतर त्यांच्या हस्ते नुकत्याच उभारण्यात आलेल्या सभागृहाचे धामणकर सभागृह असे नामकरण करण्यात आले. यानंतर पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ''शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञान अंगीकारले आहे त्यामुळे जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे, ज्ञानाधारित समाज रचनेकडे जावे लागणार आहे''.

सूर्यनमस्कार हा आपल्या शरीराचा रक्षक आहे यासाठी संस्था सूर्य नमस्कार एक अविष्कार या उपक्रमांतर्गत एक कोटी सूर्य नमस्कार घालण्याचा विक्रम नोंदविणार आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले, तसेच शंभर वर्ष पूर्ण केलेल्या संस्थांचे एकत्रीकरण व संस्थाप्रतिनीधींचा परिसंवाद, या उपक्रमांतर्गत या परिसंवादातील माहिती इतर संस्थांना उपयुक्त ठरणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले व संस्थेच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्तावित कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी केले. प्रास्ताविकात महेश दाबक यांनी संस्थेच्या वतीने विविध शाळांमधे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की , समाजाकडूनही संस्थेला मोठया प्रमाणात मदत मिळते तर धामणकर कुटूंबियांनी उभारण्यात आलेल्या नवीन सभागृहासाठी एक कोटी रूपयांची देणगी दिली तसेच यावेळी दाबक यांनी शासनाकडे तीन मागण्या सादर केल्या. यात शंभर वर्ष पूर्ण झालेल्या संस्थांना वेगळा दर्जा दयावा, शाळांना स्वायत्तता दयावी, शिक्षण विभागासाठी स्वतंत्र शैक्षणिक आयोग नेमावा असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन भाषणात संस्थेला शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय काकतकर यांनी संस्थेच्या वतीने शतक महोत्सवात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रूपाली झोडगेकर व स्वप्ना मालपाठक यांनी केले. कार्यक्रमास खासदार हरीश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हीरे, आमदार देवयांनी फरांदे, आमदार राजाभाऊ वाजे, मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार, सुप्रसिध्द अभिनेते गिरीश ओक, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुनिल कुटे, नागनाथ गोरवाडकर, श्रीपाद देशपांडे, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, मिलींद कचोरे, मधुकर जगताप, बापू जोशी, संजय परांजपे, मुख्याध्यापक प्र.ला.ठोके, श्रीमती धामणे, यासह शासकिय अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, शाळांचे पदाधिकारी, माजी विदयार्थी, शिक्षक उपस्थित होते

Web Title: Nashik News: Devendra Fadanvis education