मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘दत्तक’विधान पावणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसागणिक नाजूक होत चालल्याने त्यावर तोडगा म्हणून आता महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट दोन हजार कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला. रविवारी (ता. २८) महापालिकेत मुख्यमंत्री विविध कामांचा आढावा घेणार असून, त्यात विशेष अनुदानाची मागणी केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापालिकेकडून प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केली जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांचे ‘दत्तक’विधान पावते का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

जकात रद्द झाल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीला मोठा फटका बसला. त्यानंतर शासनानेच लागू केलेली एलबीटी करप्रणाली रद्द करून त्याऐवजी अनुदान देण्यास सुरवात केली. त्यामुळे उत्पन्नावर आणखी मर्यादा आल्या, शिवाय परावलंबित्व वाढले. महापालिकेची आर्थिक घडी विस्कळित होत असल्याचे अंदाजपत्रकावरून दिसून आले. यंदाच्या एक हजार ४१० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात भांडवली कामांसाठी फक्त १३० कोटी रुपये शिल्लक राहतील. त्यामुळे खर्चाची गणिते बसविताना दमछाक होणार आहे. त्यातच स्मार्टसिटीसाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांचा हप्ता देणे बंधनकारक आहे. कर्जापोटी घेतलेल्या रकमेचे व्याज व अमृत योजनेतील महापालिकेचा हिस्सा लक्षात घेता भविष्यात विकासकामांना निधी शिल्लक राहतो की नाही, अशी परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक संकटातून सावरण्यासाठी निधीच्या बूस्टर डोसची गरज आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. नाशिक महापालिकेतही भाजपला नागरिकांनी बहुमताच्या पलीकडे नेऊन ठेवले आहे. त्यामुळे शत-प्रतिशत भाजप झालेल्या नाशिकला मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

विविध प्रस्ताव करणार सादर
मुख्यमंत्री फडणवीस रविवारी महापालिका मुख्यालयात विविध कामांचा आढावा घेतील. त्या वेळी त्यांच्याकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव सादर केला जाईल. यात रस्ते व रिंगरोड विकास आणि आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी ८०० कोटी रुपये, किकवी धरण बांधण्यासाठी ५०० कोटी रुपये, पाणीपुरवठा, स्मार्टसिटी, अमृत योजना अंमलबजावणीसाठी निधीची मागणी आहे. महापालिकेत कर्मचारी भरतीसाठी परवानगीचीही मागणी केली जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशीही कामकाज
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शनिवार व रविवार या दोन दिवशी साप्ताहिक सुटी असली, तरी महापालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कृष्णा यांनी मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द 
केल्या आहेत.

Web Title: nashik news devendra fadnavis nashik municipal corporation