ठेवीदारांचा तगादा वाढल्याने जिल्हा बॅंकेचे कर्मचारी घामाघूम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नाशिक - राज्य सरकारने जिल्हा बॅंकेचे कर्जदार असलेल्या जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले आहे. राज्य सरकारच्या पत्रानुसार जिल्हा बॅंकेने त्या कर्जदारांच्या खात्यातील कर्जरक्कमही निरंक केली आहे. पण राज्य सरकारकडून या कर्जमाफीचे साडेसतरा लाख रुपये मिळण्याची व उर्वरित कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची जिल्हा बॅंकेला प्रतीक्षा आहे. बॅंकेला शेतकरी कर्जमाफीचे पैसे मिळू लागल्याच्या चर्चा सुरू झाल्याने ठेवीदारांनी पुन्हा बॅंकेच्या शाखांकडे धाव घेत तगादा सुरू केल्याने बॅंक कर्मचारी घामाघूम झाले आहेत. 

राज्य सरकारने बुधवारी (ता. 18) राज्यातील प्रत्येक तालुक्‍यातील दोन, याप्रमाणे जिल्हास्तरावर व प्रत्येक जिल्ह्यातील दोन, याप्रमाणे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप केल्यानंतर जिल्हा बॅंकांना या शेतकऱ्यांचे कर्जखाते निरंक करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या पत्रासोबत संबंधित शेतकऱ्यांची यादीही पाठविली. नाशिक जिल्हा बॅंकेने आज त्या यादीतील शेतकऱ्यांच्या नावावरील कर्ज व प्रत्यक्षातील कर्ज याची शहनिशा करून आज जिल्हा बॅंकेने या शेतकऱ्यांचे कर्जखाते निरंक केले. त्याचवेळी जिल्हा बॅंकेत राज्य सरकारच्या नावाने नवीन खाते तयार करून ती साडेसतरा लाखांची रक्कम राज्य सरकारच्या नावे टाकली आहे. 

जिल्हा बॅंकेत रोज मोठ्या संख्येने ठेवीदार, खातेदार येऊन रक्कम मिळण्यासाठी तगादा लावतात. त्यांना तोंड देता देता बॅंकेचे संचालकमंडळ, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या नाकीनव येते. सरकारकडून कर्जमाफीची अंमलबजावणी केल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे ठेवीदारांचा तगादा पुन्हा वाढला आहे. 

कर्जमाफीसाठी आणखी पाचशे कोटी 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने बुधवारी (ता. 18) अनुसूचित जाती उपयोजनेतील पाचशे कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर पुन्हा आज जनजाती क्षेत्र उपयोजनेतील पाचशे कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

आकडेवारीतील घोळाची दुरुस्ती 
राज्य सरकारने कर्जमाफी प्रमाणपत्र दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची यादी जिल्हा बॅंकेला पाठविली. या यादीतील शेतकऱ्यांचे दाखविलेले कर्ज व प्रत्यक्षातील कर्ज यातील आकडेवारीमध्ये तफावत होती. त्यामुळे हा घोळ मिटविण्यासाठी आज जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन 66 कॉलममध्ये भरलेल्या माहितीनुसार ती दुरुस्ती करून घेतली व त्यानुसार शेतकऱ्यांची कर्जरक्कम राज्य सरकारच्या नावे टाकली.

Web Title: nashik news District Bank