सीमावाद दूर ठेवून बहुभाषी संस्कृती वाढवा - डॉ. शिवप्रकाश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नाशिक - महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भौगोलिक सीमा कृत्रिम आहेत. मात्र, येथील साहित्य आणि संस्कृतीत खूप साम्य आहे. राजकीय कारणांमुळे सीमांबद्दल वाद असले तरी हे प्रांत आपल्या सर्वांचे आहे, अशी भावना ठेवून बहुभाषी संस्कृती आणि परंपरा वाढीस नेली पाहिजे. सीमांबद्दल वाद असले तरी साहित्यामध्ये मात्र मराठी-कानडी असा कोणताही भेद नाही, असे प्रतिपादन प्रख्यात कन्नड साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार आणि बाबूराव बागूल कथा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचित्र आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. लातूर येथील नवोदित लेखिका मेनका धुमाळे यांना बाबूराव बागूल कथा पुरस्कार देण्यात आला. 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. दोन्ही पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते देण्यात आले. कुलगुरू ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, कुसुमाग्रज अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील उपस्थित होत्या.

डॉ. शिवप्रकाश म्हणाले, की प्रत्येक भागाची लिखाणाची संस्कृती आणि संदर्भ बदलत जातात. त्या-त्या भागाच्या परिस्थितीचे तरंग त्यात उमटतात. बहुभाषा असणाऱ्या देशात हे जास्त लागू होते. भाषा हे सर्वांना एकमेकांशी जोडणारं माध्यम आहे. मराठी साहित्याचे कानडीत पुरेसा अनुवाद झालेला नाही तसेच कानडीचाही मराठी पुरेसा अनुवाद झालेला दिसत नाही. साहित्याचा अनुवाद झाल्यास सांस्कृतिक देवाणघेवाण सोपी होते. त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. ज्येष्ठ कन्नड लेखक संभा जोशी यांनी "मराठी संस्कृती' हा ग्रंथ लिहिला आहे. तसेच संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, अरुण कोल्हटकर यांच्या साहित्याने मी प्रभावित झालो आहे, असेही त्यांनी सांगितले.

काळे म्हणाले, की लेखक, कवी खूप आहेत; पण साहित्याचा दर्जा कसा हे महत्त्वाचे आहे. जीवनाविषयी विशेष साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत साहित्याला काही अर्थ राहात नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक अनुभव येतात; पण ते लिहिण्यायोग्य असतात का? अनुभव आणि अनुभूती यात फरक आहे. अनुभव जोपर्यंत मनावर आघात करत नाही, तोपर्यंत लिखाणाला काही अर्थ नाही.

धुमाळे म्हणाल्या, की स्त्रीचे जगणे सारखेच असते असे म्हटले जाते; परंतु त्यात फरक आहे. जगणं आणि भोगणं यातलं अंतर टिपण्याचा प्रयत्न शब्दांच्या माध्यमातून केला आहे. जगण्याच्या प्रवासात स्त्री प्रत्येक ठिकाणी एकटी वावरते. स्त्री म्हणून तिची अवहेलना अजूनही कमी झालेली नाही. त्याचा वेध साहित्यातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: nashik news dr. h. s. shivprasad talking