गो विज्ञानाने करा प्रगत शेती - डॉ. भटकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

नाशिक - दिवसेंदिवस देशातील पीक क्षेत्रात घट होत असल्याने शेती उत्पादनात घट येत आहे. मात्र, देशाच्या एकशेतीस कोटी जनतेला पोसणारे ते एकमेव क्षेत्र असून, शेतकरी जगला तर जग जगेल. देशात हरितक्रांतीमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या; परंतु दुर्दैवाने वेगवेगळ्या रसायनांच्या वापराने आपले अन्न आज विषमय बनले असून, गो विज्ञान जाणून घेत त्याच्या साहाय्याने प्रगत शेती करा, असा सल्ला ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती, पद्‌भूषण डॉ. विजय भटकर यांनी आज दिला.

जय किसान फार्मर्स फोरमतर्फे देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीचे औचित्य साधत आज दुपारी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात राज्यातील चाळीस शेतकऱ्यांना सपत्निक कृषिरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भटकर होते. उद्‌घाटक म्हणून राजस्थानचे पशुसंवर्धनमंत्री जगमोहन बघेल, तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर देशाने कृषी क्षेत्रासह ऑटोमोबाइल्ससह अनेक क्षेत्रांत भरीव प्रगती केली. परंतु देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्राला खऱ्या अर्थाने भरभराटीला आणले. आज शेतकी उत्पादनात जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो, असे डॉ. भटकर म्हणाले. रासायनिक शेतीने आज आपले अन्न विषमय झाले असून, ते टाळण्यासाठी गाईच्या मागे दडलेले विज्ञान समजून घेत गो विज्ञानाने शेती करा, असा सल्ला त्यांनी शेवटी दिला.

या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनील बाऱ्हाते, कांतीलाल नाळे, रामनाथ निरभवणे, मच्छिंद्र पवार, बाळासाहेब माळी, लक्ष्मण वाघ आदी चाळीस शेतकऱ्यांचा सपत्निक कृषिरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला "शेतकरी गौरव' व "पीक संरक्षणाचे सूत्र' या शेतीवर आधारित दोन पुस्तकांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: nashik news dr vijay bhatkar advice